जळगाव मिरर । ११ डिसेंबर २०२५
शहरातील औद्योगिक वसाहतमधील ठिबक नळ्या बनवणाऱ्या साई किसान कंपनीला आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. आग लागताच कंपनीमधील कर्मचाऱ्यांनी बाहेर पळ काढल्याने सुदैवाने जीवित हानी टळली मात्र, या घटनेत कंपनीमधील मशिनरीसह साहित्य जळाल्याने कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त असे कि, एमआयडीसी परिसरातील ‘के’ सेक्टरमध्ये जगन्नाथ जाधव यांच्या मालकीची साई किसान नावाची ठिबक नळी तयार करण्याची कंपनी आहे. या कंपनीमध्ये नियमित काम सुरू असताना बुधवारी रात्री साडे नऊ वाजता अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच कंपनीमधील २० ते २५ कर्मचारी तत्काळ बाहेर आले. त्यामुळे सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र प्लास्टिक उत्पादन असल्याने आगीने त्वरित रौद्ररूप धारण केले. काही क्षणातच आगीच्या ज्वाळा व धुरांचे मोठे लोट निघू लागले. आग लागताच ती गोदामाच्या दिशेने पसरली व काही क्षणात बाहेर असलेल्या ट्रान्सफॉर्मरचाही स्फोट झाला. त्यामुळे आगीची तीव्रता अधिक वाढली. आग लागताच अन्य ठिकाणी काही दुर्घटना घडून नये म्हणून महावितरणच्यावतीने तात्काळ या परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला. वीज पुरवठा खंडित झाल्याने अंधार व पळापळ यामुळे मदत कार्यातही मोठी अडचण येत होती.
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी रोहन घुगे, प्रांताधिकारी विनय गोसावी, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. ज्या कंपनीमध्ये आग लागली त्या ठिकाणी मंगळवारी ट्रांसफार्मर व कट आउट बदलविण्यात आले होते, अशी माहिती कंपनी मालक जगन्नाथ जाधव यांनी दिली. तसेच आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच जळगाव महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ४ बंबांसह भुसावळ, वरणगाव, नशिराबाद व जिल्ह्यातील अन्य ठिकाणचे बंब घटनास्थळी दाखल झाले. याद्वारे आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग एवढी होती की तिची आजूबाजूच्या दोन कंपन्यांनाही झळ बसली.




















