जळगाव मिरर / १९ फेब्रुवारी २०२३ ।
जळगाव शहर महानगरपालिका नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत येत असते. शुक्रवारी शिवसेनेच्या नावासह धनुष्यबाण शिंदे गटाला मिळाल्याने राज्यभर त्याचा जल्लोष देखील करण्यात आला हाच जल्लोष जळगाव मनपा बाहेरही झाला होता. तर दुसऱ्या दिवशी नगरसेवक दिलीप पोकळे यांनी मनपातील शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवक व महापौरासह विरोधी पक्ष नेत्यांनी राजीनामा देण्याची मागणी केल्याने जळगावात एकच राजकीय चर्चा सुरु झाली आहे.
शिवसेना नावासह धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याचे आता अधिकृतरीत्या जाहीर झाले असून केंद्रीय निवडणूक आयोगाने तसा निर्णय दिलेला आहे. महापौर, विरोधी पक्षनेत्यांसह शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी आपली पदे तत्काळ सोडावीत, अशी मागणी नगरसेवक अॅड. दिलीप पोकळे यांनी केली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने झालेल्या सुनावणीअंती शिवसेना नावासह चिन्हावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हक्क असल्याचा निर्णय शुक्रवारी दिलेला आहे. महापौर, विरोधी पक्षनेते, नगरसेवक यांनी या नावाचा आता महापालिकेच्या कोणत्याच कामात वापर करू नये, असे पोकळे यांनी म्हटले आहे.
