
जळगाव मिरर | ३ एप्रिल २०२६
जळगाव शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या पोलनपेठ परिसरात गुरुवारी मध्यरात्री अत्यंत धाडसी आणि नियोजनबद्ध चोरीची घटना घडली असून, चोरट्यांनी थेट एटीएम मशीनच उखडून नेल्याने खळबळ उडाली आहे. ‘एक्विटास स्मॉल फायनान्स बँके’च्या एटीएम केंद्रावर टाकण्यात आलेल्या या दरोड्यात सुमारे ७ लाख रुपयांची रोकड आणि मशीनसह एकूण ९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. ही घटना ३ एप्रिल रोजी मध्यरात्री सुमारे १.२५ वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी प्रथम जोशी पेठ परिसरातून एक मालवाहू वाहन चोरले आणि त्यानंतर पोलनपेठेतील सत्यम प्लाझामधील एटीएम केंद्र गाठले.
सीसीटीव्ही फुटेजनुसार, एक संशयित तोंडाला रुमाल बांधून एटीएम केंद्रात शिरला. त्याने अत्यंत सराईतपणे एटीएम मशीनला जाड दोरखंड बांधला. हा दोर बाहेर उभ्या असलेल्या मालवाहू वाहनाला जोडण्यात आला. त्यानंतर वाहनाच्या सहाय्याने जोरात हिसका दिला असता एटीएम मशीन जमिनीवरून उखडले गेले. मशीन खाली पडताच बाहेर दबा धरून बसलेले इतर तीन साथीदार आत शिरले. अवघ्या सहा मिनिटांत, म्हणजे १.३१ वाजेपर्यंत त्यांनी जड एटीएम मशीन वाहनात टाकले आणि भुसावळच्या दिशेने पलायन केले. ही संपूर्ण कारवाई इतक्या वेगाने पार पडली की परिसरात कोणालाही याची चाहूल लागली नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. काही वेळातच कंडारीजवळील मन्यारखेडा शिवारात चोरलेले मालवाहू वाहन आणि फोडलेल्या अवस्थेत एटीएम मशीन सापडले. मात्र, चोरट्यांनी मशीनमधील सुमारे ७ लाख रुपयांची रोकड काढून घेतली होती. बँकेचे शाखा व्यवस्थापक हरीश गांधी यांनी दिलेल्या माहितीनुसार, २ एप्रिल रोजी एटीएममध्ये १० लाख रुपये भरण्यात आले होते. चोरीच्या वेळी सुमारे ७ लाख रुपये शिल्लक होते. तसेच एटीएम मशीनचे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले असून, एकूण ९.५ लाख रुपयांचा फटका बसला आहे.
या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असून, पोलिसांकडून विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या घटनेमुळे जळगाव शहरातील सुरक्षेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.






















