जळगाव मिरर | ३० जानेवारी २०२४
इतर मागासवर्गीय समाजावरील अन्यायाविरोधात लढताना मंत्रीपद गमवावं लागलं, तरी मला त्याची पर्वा नाही, अशी संप्तत प्रतिक्रिया अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी येथे बोलून दाखवली. विविध वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतींदरम्यान भुजबळ यांनी या प्रश्नावर त्यांच्या पक्षाला, राष्ट्रवादी काँग्रेसलाही (अजित पवार गट) ललकारले.
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारने काढलेली अधिसूचना आणि सुरू असलेले सर्वेक्षण या दोन्हीवरून भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. रविवारी संध्याकाळी ‘सिद्धगिरी’ या त्यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांनी सर्व पक्षांतील इतर मागासवर्गीय नेते व माजी सनदी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी मेळावे आणि मोर्चाचा कार्यक्रम जाहीर केला. ‘अधिसूचनेचा मसुदा पाहता त्यात विशेष काही नाही. सरकारने जुनीच आश्वासने नव्या भाषेत दिली आहेत,’ अशी सुरुवातीला भूमिका घेणाऱ्या भुजबळ यांनी सोमवारी मात्र ‘कोणत्याही परिस्थितीत इतर मागासवर्गीय समाजावर अन्याय होऊ देणार नाही. यात पक्ष किंवा सरकारची भूमिका वेगळी असेल, तर त्यांनी मला निलंबित करून दाखवावे,’ अशी आव्हानात्मक भाषा सुरू केली.
‘मराठ्यांना मागच्या दाराने ओबीसींमध्ये घुसवले जात असून हा अन्याय आहे,’ असा आरोप करून भुजबळ म्हणतात, मराठा समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाला आमचा विरोध नाही. त्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत लढण्यास तयार आहेत. परंतु त्यांना ओबीसींमधून आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे. ओबीसींमध्ये अनेक छोट्या-छोट्या मिळून ३७४ जाती आहेत. यामधील अनेक जाती अतिशय मागासलेल्या आहेत. मराठा समाज ताकदवान आहे. ओबीसींमध्ये आल्यास या आरक्षणाचा मोठा वाटा त्यांना जाईल. यामुळे या छोट्या जातींवर अन्याय होईल. परंतु आमची ही भूमिका समजून घेतली जात नाही. मुख्यमंत्री व सरकार बाजू मांडत आहे; परंतु परिस्थिती वेगळी असल्याने आमचे समाधान होत नाही. ओबीसींच्या हक्कासाठी लढण्याला आपले सर्वाधिक प्राधान्य असणार आहे. गरज पडल्यास न्यायालयीन लढाईही लढू. वेळ आली तर सरकारमधून बाहेर पडायलाही मागेपुढे पाहणार नाही. मी माझी भूमिका बदलणार नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भुजबळ यांच्या आरोपांचे खंडन केले आहे- वैयक्तिक लढाई लढताना भुजबळ यांनी सरकारचीही भूमिका विचारात घ्यावी, अशी प्रतिक्रिया भाजपमधून उमटली असून फडणवीस यांनी ‘भाजप सत्तेत असेपर्यंत ओबीसींवर अन्याय होऊ दिलाच जाणार नाही,’ असा शब्द दिला आहे. भुजबळ यांनी चर्चेसाठी यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. भुजबळ यांच्याच पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी भुजबळांबाबत हात झटकले आहेत. ‘मराठा समाजात ओबीसींमधून आरक्षणाला विरोध ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची भूमिका नसून ती भुजबळ यांच्या समता परिषदेची भूमिका आहे,’ असे स्पष्टीकरण त्यांनी सोमवारी दिले. पवार यांनी मात्र ‘आम्ही भुजबळांशी चर्चा करणार आहोत’, अशी संयमी प्रतिक्रिया दिली आहे.