जळगाव मिरर । ९ जानेवारी २०२३
जिल्ह्यातील एका सामाजिक कार्यक्रमास नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असता एकाच व्यासपीठावर भाजप व शिंदे गटातील मंत्री होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीतील ते गुपित उघडले होते, त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा यावेळी एक मोठा खुलासा केला आहे.
गेल्या सहा महिन्यापूर्वी शिवसेनेतून बाहेर पडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का दिला. सुरुवातीला 18 आमदारांसह सूरतला गेलेल्या एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीपर्यंत पोहोचत शिवसेनेच्या 40 आमदार आणि 12 खासदारांचा पाठिंबा मिळवला. याच पाठिंब्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत मिळून राज्यात सत्ता स्थापन केली आहे. सत्तास्थापनेआधी महिनाभर हा सूरत – गुवाहाटी – गोवा असा प्रवास करत एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. मात्र हे सर्व कसे घडले याचा खुलासा कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील लोहारी येथे अखिल भारतीय बडगुजर समाजाचे महाधिवेशन पार पडलं. या कार्यक्रमात बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेनेत पडलेली फूट, एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवासच सांगितला. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसे झाले यावर आम्हालाही विश्वास नव्हता असेही गिरीश महाजन म्हणाले.
“एकनाथ शिंदे कसे मुख्यमंत्री झाले? या गोष्टीचा विचार केला तर आम्हालाही विश्वास बसत नव्हता. मात्र ऑपरेशन सुरू केलं. एकनाथ शिंदे पुढे निघाले. ते पुढे गेले आणि बघता बघता त्यांचं सर्व सैन्य त्यांच्या मागे गेलं आणि शेवटी सगळं जमलं. जुळून आलं आणि घडून आलं. यामागे चामुंडा मातेचाही आशीर्वाद होता,” असे गिरीश महाजन म्हणाले. “हे एवढं सोपं नव्हतं. शिवसेनेसारख्या पक्षातून उद्धव ठाकरे यांना कंटाळून 40 जण बाहेर पडतात. सतरा अठरा लोक घेऊन बाहेर पडायचं आणि पन्नासपर्यंत मजल गाठायची हे खूप अवघड होतं. मध्येच मिशन फेल झालं तर काय करायचं असं वाटायचं. पण पुढारी कसे असतात तुम्हाला माहिती आहे, आम्ही कसे असतो तुम्हाला माहिती आहेस,” असेही गिरीश महाजन म्हणाले.
“मी मुख्यमंत्र्यांना सांगतो की चार तास तरी झोपा. तरी ते तीन वाजेपर्यंत काम करत असतात. अडीच वर्षातला पूर्वीचा काळ आठवा. मुख्यमंत्री मंत्रालयाची पायरीसुद्धा चढले नाहीत आणि आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बघा. आज राज्याला खऱ्या अर्थाने आमचा जाणता राजा असल्याचे वाटत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री रात्रंदिवस काम करत आहेत,” असेही कौतुक गिरीश महाजन यांनी केले.