जळगाव मिरर | १ सप्टेंबर २०२६
मीरा भाईंदर पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाने जळगावात येवून दोन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तब्बल सव्वा कोटी रुपये किंमतीचे ४ किलो ९०० ग्रॅम एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला. जळगावात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात आमली पदार्थ मिळून आल्याने खळबळ माजून गेली आहे. या कारवाईनंतर जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्जची तस्करी होत असतांना स्थानिक यंत्रणांना याबाबत साधी कल्पना देखील नसल्याने या यंत्रणा कुचकामी ठरु लागल्या आहेत.

जळगाव शहरात गांजापाठोपाठ एमडी या अमली पदार्थाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही महिन्यांपासून पोलीस दलाकडून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचे रॅकेट उद्धवस्त करण्यासाठी कारवाईची मोहीम राबविली जात आहे. शहरातील शाहनगर, गेंदालाल मिल, मास्टर कॉलनी, फातेमा नगर या भागात झालेल्या कारवायांमधून मोठा एमडी ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर आता मीरा भाईंदर गुन्हे शाखेच्या पथकाने एमडी प्रकरणात त्यांच्या हद्दीत एका जणाला ताब्यात घेतल्यानंतर त्याने एमडीचा काही साठा जळगावात दिल्याची माहिती पथकाला दिली. त्यानुसार मीरा भाईंदर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद बडाख, उपनिरीक्षक उमेश भागवत हे पाच कर्मचाऱ्यांसह जळगावात पोहचले.
पथकाने स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेत सुरुवातीला मेहरुण परिसरातील रामनगरातून रहीम ताहेर पिंजारी (वय २८, रामनगर) याला ताब्यात घेतले. त्याने उस्मानिया पार्क परिसरातील सय्यद मुशादूर अली मुमताज अली (वय २९) याच्या घरात एमडीचा साठा ठेवल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार या पथकाने छापा टाकून ४ किलो ९०० ग्रॅम एमडी जप्त केले. त्याची किंमत एक कोटी रुपयांच्या पुढे असून दोघांना घेवून पथक मध्यरात्रीच मीराभाईंदरच्या दिशेने रवाना झाले.
जळगावातून जप्त केलेला एमडी ड्रग्जचा साठा करणारे दोघे संशयितांनी हा त्यांच्या साखळीतील पुढील व्यक्तीला विक्रीसाठी आणल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले आहे. जळगावात झालेल्या कारवाई नंतर पथकाने मध्यप्रदेशात जाऊन कारवाई केली आहे. यामध्ये तेथे ५० किलो एमडी साठा पथकाच्या हाती लागल्याची माहितीही समोर येत आहे. शहरात कोट्यावधी रुपयांचे एमडी ड्रग्जचा साठ्यावर मीरा भाईंदर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईबद्दल स्थानिक पोलिसांना साधी कुणकुण देखील नव्हती. या कारवाईनंतर पोलिसांनी शहर पोलीस ठाण्यात नोंद करुन ते माघारी फिरले. या कारवाईची संबंधित पोलीस निरीक्षकांनी वरिष्ठांना माहिती न दिल्यामुळे वरिष्ठ अधिकारी या कारवाईबद्दल अनभिज्ञ होते.

















