जळगाव मिरर | २८ जून २०२४
राज्यात पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला आहे. यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाची घोषणा करत यासाठी दरवर्षी 46 हजार कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली असल्याची घोषणा त्यांनी केली. जुलै 2024 पासून सुरु होणाऱ्या या योजनेत महिलांना प्रतिमाह 1500 रुपये मिळणार आहेत. पावसाळी अधिवेशनादरम्यान अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. या दरम्यान त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे.
स्त्री ही कुटुंबाचा आधार आहे. एकहाती कुटुंब सांभाळणाऱ्या महिलाही आपल्याला पाहायला मिळत आहेत. या महिलांना संधी उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे. म्हणूनच आमच्या लेकी-बहिणींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करत असल्याचे अजित पवार यांनी या योजनेची घोषणा करताना म्हटले आहे. ही एक व्यापक आणि महत्त्वाकांक्षी योजना असल्याचेही अजित पवार यांनी म्हटले आहे. महिलांचे स्वावलंबन, पोषण अशा सर्वांगीन विकासासाठी या योजेअंतर्गत 21 ते 60 वर्षे वयाच्या पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. यासाठी दरवर्षी 46 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात येईल. या योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून करण्यात येणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अद्याप पंचनामे न होणे, काही ठिकाणी चुकीचे पंचनामे होणे इत्यादी कारणांमुळे अद्यापही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नसल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या वतीने विधानसभेत करण्यात आला आहे. या प्रश्नाचे उत्तर देताना मंत्री अनिल पाटील यांनी NDVI निकषांचा उल्लेख केला. मात्र, NDVI म्हणजे काय? याचा पूर्ण अर्थ काय? असा प्रश्न उपस्थित करत विरोधी पक्ष नेत्यांनी राज्यातील मंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. अनिल पाटील उत्तर देत असताना मध्येच धनंजय मुंडे यांनी बोलण्यास सुरूवात केल्याने विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि धनंजय मुंडे यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली होती.
