जळगाव मिरर / ११ फेब्रुवारी २०२३ ।
जळगाव जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये पुतणीच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून दुसऱ्या एका नातेवाईकाकडे जात असताना काकाचा रस्ता अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुकदेव जनार्दन तायडे (वय 55, रा. कानसवाडा ता.वरणगाव) असे मृत काकाचे नाव आहे. गुरुवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास वरणगाव शहरातील आराधना हॉटेलसमोर हा अपघात झाला.
काय आहे घटना !
वरणगाव येथील महर्षी वाल्मिक नगरात गुरुवारी सुकदेव तायडे यांच्या लहान भावाची मुलगी म्हणजेच पुतणी हिचा हळदीचा कार्यक्रम होता. तर शुक्रवारी तिचा विवाह सोहळा होता. यासाठी सुकदेव जनार्दन तायडे हे जळगाव तालुक्यातील कानसवाडा येथून त्यांच्या एएच 19 सीके 9330 या दुचाकीने सहकुटूंब वरणगाव येथे आले होते. यानंतर ते हळदीचा कार्यक्रम आटोपून गुरुवारी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास सुकदेव तायडे हे वरणगाव या गावापासून काही अंतरावर असलेल्या भुसावळ तालुक्यातील फेकरी येथील नातेवाईकाकडे जात होते.
यादरम्यान वरणगाव शहरातील आराधना हॉटेलजवळ सुकदेव तायडे यांनी एका पायी चालणाऱ्या व्यक्तीला धडक दिली. त्यानंतर भरधाव वेगात असणारी त्यांची दुचाकी समोर असलेल्या लिंबाच्या झाडावर जाऊन आदळली. यामध्ये सुकदेव तायडे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयत हलविण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. क्षितीजा हेडवे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी भीला शांताराम कोळी यांनी दिलेल्या खबरीवरुन वरणगाव पोलीस स्टेशनमध्ये अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुकदेव तायडे यांच्या माघारी पत्नी, दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.
अपघाताची बातमी उशीरापर्यंत लग्नाच्या ठिकाणी कळविण्यात आली नाही. सुकदेव तायडे जखमी असून आयसीयूमध्ये असे सांगण्यात आले. शुक्रवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सर्वत्र पसरली. सुकदेव तायडे यांच्या मृत्यूमुळे धामधुममध्ये होणारा पुतणीचा विवाह सोहळा साध्या पध्दतीने एका मंदिरात पार पडला. या घटनेमुळे लग्नघरात सगळीकडे शोककळा पसरली. यानंतर शोकाकुल वातावरणात सुकदेव तायडे यांच्यावर त्यांच्या कानसवाडा या गावी शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
