
जळगाव मिरर | २५ सप्टेंबर २०२५
रावेर येथील एका खासगी रुग्णालयाकडून १५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नाशिक येथील क्षेत्र अधिकारी राजेंद्र पांडुरंग सूर्यवंशी (वय ४२, रा. नवआकाश सोसायटी, धात्रक फाटा, नाशिक) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ अटक केली. ही कारवाई खाजगी पंटर मार्फत फोनपे अॅपवर लाच स्वीकारताना करण्यात आली. कारवाईनंतर पंटर पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.
ही धाडसी कारवाई जळगाव ACBचे पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत नागरे, नाईक बाळू मराठे, शिपाई भूषण पाटील यांच्या पथकाने बुधवारी (२४ सप्टेंबर) केली.
प्रकरण काय आहे?
रावेर येथील एका खासगी हॉस्पिटलच्या मॅनेजरने तक्रारदार म्हणून ACBकडे तक्रार दाखल केली होती. हॉस्पिटलच्या बायोवेस्ट प्रमाणपत्रासाठी १६ मार्च रोजी अर्ज करण्यात आला होता. सुरुवातीला जळगाव कार्यालयात काही त्रुटी झाल्यानंतर, नाशिक कार्यालयातून २८ ऑगस्ट रोजी प्रमाणपत्र देण्यात आले. मात्र, जळगाव कार्यालयातील अर्ज मागे घेण्यासाठी ११ सप्टेंबर रोजी तक्रारदार गेले असता, अधिकारी सूर्यवंशी यांनी त्यांच्याकडे १५ हजार रुपयांची लाच मागितली.
तक्रारदाराने लाच न देण्याचा निर्णय घेत जळगाव ACBकडे २३ सप्टेंबर रोजी तक्रार केली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. २४ सप्टेंबर रोजी खाजगी पंटर मनोज बापू गाजरे याने फोनपे अॅपद्वारे ही रक्कम स्वीकारली. मात्र, रक्कम मिळाल्यानंतर तो पसार झाला. यावेळी अधिकारी सूर्यवंशी यांना तात्काळ अटक करण्यात आली. याच वेळी सूर्यवंशी यांच्या कार्यालयातील हँडबॅगमध्ये २ लाख २६ हजार रुपयांची संशयित रोख रक्कम सापडली असून, ती जप्त करण्यात आली आहे. या घटनेमुळे मंडळातील अन्य कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.




















