जळगाव मिरर | १ नोव्हेंबर २०२५
राज्यातील स्थानिक निवडणुकीपूर्वीच विरोधकांनी भव्य मोर्चा आज काढला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी राज्यातील दुबार मतदारांच्या नावांचा ढिग दाखवून बोगस मतदार याद्यांचे पुरावे दिले. महाराष्ट्रात निवडणुकीच्या नावाखाली प्रचंड गोंधळ सुरू आहे. कोर्टाच्या आदेशाच्या नावाखाली जानेवारीत निवडणूक घेण्याचा हट्ट सुरू आहे. या लोकांनी मागील 5 वर्षांत निवडणुका घेतल्या नाही. पण आत्ता घाई करत आहेत. अजून 1 वर्षे घेतली नाही, तर काय फरक पडतो? या लोकांचा जुन्याच मतदार यादीवर निवडणूक घेऊन यश पदरात पाडून घेण्याचा डाव आहे, असे राज ठाकरे म्हणालेत. यावेळी त्यांनी दुबार मतदारांना ठोकून काढण्याचाही इशारा दिला.
महाविकास आघाडी व मनसेने आज मुंबईत मतदार याद्यांतील घोळ व मतचोरीच्या मुद्यावरून ‘सत्याचा मोर्चा’ काढला. त्यानंतर आयोजित सभेत बोलताना राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगासह महायुती सरकारवर कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले, आजचा मोर्चा हा राग व ताकद दाखवण्याचा, दिल्लीपर्यंत समजण्याचा व समजावून सांगण्याचा मोर्चा आहे. या प्रकरणी माझ्यासकट सर्वांनीच भाष्य केले आहे. खरे तर मतदार यादीत दुबार मतदार आहेत हा फार छोटा विषय आहे. या प्रकरणी आम्ही सर्वजण बोलत आहोत. उद्धव ठाकरे बोलत आहेत. शरद पवार बोलत आहेत. शेकाप, डावे व काँग्रेसही बोलत आहे. एवढेच नाही तर सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिंदेंचे लोकही दुबार मतदार असल्याचे बोलत आहेत.
अरे मग अडवलंय कुणी? हे लोक निवडणूक घेण्याची घाई का करत आहेत? साधी गोष्ट आहे. मतदार याद्या साफ करा. त्या पूर्ण पारदर्शक केल्यानंतर निवडणूक घ्या. त्यानंतर यश – अपयश कुणाचे ही गोष्ट मान्य. पण सध्या जे लपून – छपून चालू आहे ते कशासाठी?
राज ठाकरे यावेळी मतदार यादी दाखवत म्हणाले, मी दोन-तीन गोष्टी दाखवण्यासाठी येथे आणल्या आहेत. कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड व भिवंडी येथील 4,500 मतदारांनी मलबार हिल मतदारसंघात मतदान केले आहे. असे लाखो लोक महाराष्ट्रभर आहेत. या लोकांचा बोगस मतदानासाठी वापर करण्यात आला. पण त्यानंतरही सत्ताधारी लोक या प्रकरणी पुरावे दाखवण्याची मागणी करत आहेत.
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात 17 लाख 29 हजार 456 मतदार आहेत. त्यापैकी 62 हजार 370 मतदार दुबार आहेत. मुंबई नॉर्थ वेस्ट मतदारसंघात 16 लाख 74 हजार 861 मतदार आहेत. त्यापैकी 60 हजार 231 मतदार दुबार आहेत. मुंबई नॉर्थ ईस्ट मतदारसंघात 15 लाख 90 हजार 710 मतदार आहेत. त्यापैकी 92,983 मतदार दुबार आहेत. मुंबई नॉर्थ सेंट्रल मतदारसंघात 16 लाख 81 हजार 48 मतदार आहेत. त्यापैकी 63 हजार 740 दुबार मतदार आहेत, असे राज ठाकरे यावेळी मुंबईसह महाराष्ट्रातील विविध लोकसभा व विधानसभा मतदारसंघातील बोगस मतदारांची आकडेवारी सादर करताना म्हणाले.
यावेळी त्यांनी या बोगस मतदारांचा पुरावा देण्यासाठी मतदार याद्यांच्या ढिगाचा पुरावाही दाखवला. ते ‘अरे काढ रे ते कापड’ म्हणताच, तिथे दुबार मतदारांच्या नावांच्या कागदपत्रांचा ढिगारा दिसला. हे सर्व दुबार मतदार आहेत, असे राज ठाकरे म्हणाले. ते बोगस मतदार याद्यांच्या ढिगाऱ्याकडे बोट दाखवत म्हणाले, हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत. हे फक्त मी सांगितलेल्या मतदार संघातील दुबार मतदार आहेत. यावरून महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचा गोंधळ सुरू आहे दिसून येईल.
एवढे पुरावे देऊनही कोर्टाने सांगितले म्हणून जानेवारीत निवडणूक घेण्याचा हट्ट सुरू आहे. कशा घ्या? का घ्या? कुणाला आहे घाई? या लोकांनी मागील 5 वर्षांत निवडणुका घेतल्या नाहीत. अजून 1 वर्ष गेले तर काय फरक पडतो? पण जी माणसे आतमध्ये भरली आहेत त्याचे काय करायचे? मग जुन्याच मतदार यादीवर निवडणुका घ्यायच्या आणि यश पदरात पाडून घ्यायचे असा यांचा डाव आहे. याला काय निवडणुका म्हणतात? याने लोकशाही टिकेल का? पैठणच्या आमदाराचा मुलगा सांगतो की, मी 20 हजार मतदार बाहेरून आणली. यांची हिंमत बघा. सत्तेचा माज बघा, असे राज ठाकरे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, नवी मुंबईच्या आयुक्तांच्या बंगल्यावर मतदार नोंदवले गेलेत. कुणीतरी सुलभ शौचालयात नोंदवला गेला. कुठेही बसलेला दिसला की नोंदवायचा का? ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट देशभर सुरू आहे. मी 2017 पासून ओरडून सांगतो की यात (ईव्हीएम) गडबड आहे. गोंधळ आहे. अहो, 232 आमदार निवडून आल्यानंतर महाराष्ट्रात ‘मातम’ असेल, सन्नाटा असेल, काहीच नसेल, मतदार गोंधळलेले असतील, सर्वांना आश्चर्य वाटत असेल तर हा गोंधळच आहे. निवडून आलेले लोक स्वतःचा चिमटा काढून पाहत होते. मी निवडून आलो, यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता.
कारण, निवडून येण्याची सोय अगोदरच झाली होती. त्यामुळे त्याला मी निवडून येणार हे माहिती नव्हते. ही सगळी कारस्थाने, या सर्व गोष्टी निवडणूक आयोगाच्या मार्फत सुरू आहेत. कशा निवडणुका लढवायच्या? मला जरा सांगा. मतदार उन्हातान्हात रांगेत उभा राहून मतदान करणाऱ्या मतदारांच्या मतांचा हा अपमान नाही का? मतदारांनी मतदान करायचे, पण मॅच अगोदरच फिक्स आहे. मग त्याच्या मताला काय किंमत आहे?



















