
जळगाव मिरर । २३ सप्टेंबर २०२५
नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाविकांना घेऊन जाणारी एक रिक्षा उलटून अपघात झाला आहे. शहरातील रामेश्वर कॉलनीतील रहिवासी असलेले नऊ भाविक या अपघातात जखमी झाले आहेत. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना सोमवारी सकाळी ७ वाजता ममुराबादजवळ घडली.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील रामेश्वर कॉलनीतील काही रहिवासी नवरात्रीनिमित्त यावल तालुक्यातील शिरागड येथे आंघोळीसाठी रिक्षाने जात होते. त्यांची रिक्षा ममुराबादजवळ अचानक पलटी झाली. या अपघातात रिक्षातील नऊ भाविकांना जबर मार लागला. काहींना किरकोळ दुखापती झाल्या, तर काहींना गंभीर दुखापत देखील झाली आहे. अपघातानंतर ग्रामस्थांच्या मदतीने सर्व जखमींना तात्काळ जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद जळगाव तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
या अपघातात आशा चितोळे (वय ४८), बाळू साबळे (वय ४८), सुलाबाई माळी (वय ६०), मथुराबाई साबळे (वय ७०), ज्योती साबळे (वय २८), द्वारकाबाई भाऊसाहेब (वय ५०), मंदाबाई साबळे (वय ४८), ओम बाळू साबळे (वय १९) आणि धनराज माळी (वय २३) यांचा समावेश आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असून, काहींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे




















