जळगाव मिरर | २७ फेब्रुवारी २०२४
मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली. सामाजिक कार्यकर्ता होता, तोपर्यंत सर्व ठीक होते. आता हद्दीच्या बाहेर गेल्यावर कार्यक्रम करतोच, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवन परिसरात नाना पटोले यांच्यासोबत संवाद साधताना शिंदे यांनी केलेले हे वक्तव्य आता चांगलेच चर्चेत आले आहे.
मराठा समाजाला शिक्षण, नोकरीत आरक्षण देण्यासाठी सरकारने १० टक्क्यांची मर्यादा वाढवणारे विधेयक मंजूर केले. सरकारने मराठ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत आंदोलनकर्ते जरांगे-पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेचसागर या शासकीय बंगल्यावर धडकणार असल्याचा जाहीर इशारा दिला. मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांनी या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत जरांगे-पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे आंदोलन त्यांनी मागे घ्यावे. कायदा हातात घेऊ नये, अन्यथा कारवाईचा बडगा उगारला जाईल, असे सांगत सज्जड दम भरला. अशातच अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. विरोधकांनी जरांगे-पाटील यांची मागणी लावून धरत सरकारची यावेळी कोंडी केली.
दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानभवन परिसरात भेट झाली. पटोले यांनी आरक्षण आणि राजकीय स्थितीवर मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला. मुख्यमंत्र्यांनी त्यावर उत्तर देताना ‘ते सामान्य कार्यकर्ता होते, तोपर्यंत ठीक होते. आपल्या हद्दीच्या बाहेर गेले की कार्यक्रम करून टाकतो,’ असे हातवारे करत वक्तव्य केले. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर दोघांमध्ये एकच हास्यकल्लोळ उडाला. प्रसार माध्यमांच्या कॅमेऱ्यात मुख्यमंत्र्यांचे विधान फीड झाले आणि क्षणात ते व्हायरल झाले.