जळगाव मिरर / २३ मार्च २०२३
जळगाव शहरातील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे IEEE च्या मुंबई सेक्शन च्या वतीने टेक्नोव्हेशन २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच IEEE साठी या स्पर्धेचे आयोजन होत आहे, आणि ते गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात होत असल्याने ही बाब जळगावच्या दृष्टीने खूप महत्वपूर्ण असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.एच पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
त्यांनी पुढे बोलतांना सांगितले कि, जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक या जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील तब्बल १११ स्पर्धकांनी यात सहभाग नोंदवला असून ही स्पर्धा दि. २५ मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने संगणक शास्त्र, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल्स या शाखेच्या शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. यामधून प्रथम तीन क्रमांकाचे विजेते अंतिम फेरी साठी पात्र ठरतील. स्पर्धेचे उद्घाटन IEEE मुंबई विभागाचे प्रो. श्रीकांत सावंत व प्रो. प्रमोद भिडे हे उपस्थित असतील त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील हे उपस्थित राहणार आहेत. यादरम्यान त्यांनी शहरातील अन्य ११वी १२वीत शिक्षण घेणाऱ्या तसेच डिप्लोमा आणि डिग्रीला असणाऱ्या विद्यार्थ्यांना हे प्रदर्शन व स्पर्धा बघण्यास येण्याचे आवाहन केले आहे.