
जळगाव मिरर | १६ मार्च २०२६
वरणगाव पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त करत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्या नेतृत्वाखाली स्थागुशा पथकाने वरणगाव पोलीस स्टेशन हद्दीत गस्तीदरम्यान संशयित संजय गोपाल चंदेले (वय ५०, रा. ऑडन्स फॅक्टरी परिसर, वरणगाव) याला ताब्यात घेतले.
त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून सिल्वर रंगाचे गावठी पिस्तूल (कट्टा) व दोन पितळी जिवंत काडतुसे असा सुमारे २ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी हा मुद्देमाल ताब्यात घेत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी प्रेमचंद सपकाळे, सलीम तडवी, उमाकांत पाटील, श्रीकृष्ण देशमुख, रविंद्र चौधरी, छगन तायडे व रतन गिते यांनी केली.
दरम्यान, आरोपीला मुद्देमालासह वरणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात ठेवण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून शस्त्रसंबंधी माहिती अथवा संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहन केले आहे.




















