जळगाव मिरर | ३० मार्च २०२४
रावेर तालुक्यातील सावदा ते कोचूर रोडवर असलेल्या शेतात सालदार म्हणून काम करणार्या प्रौढाचा निर्घृण खून झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सावदा ते कोचूर रोडच्या दरम्यान असलेल्या शेतात शोभाराम रिचू बारेला ( वय ४५) हा व्यक्त सालदार म्हणून काम करत असून तो शेतात बांधलेल्या खोलीतच वास्तव्यास होता. आज सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला असून डोक्यात दगड घालून त्याला संपविण्यात आल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. ही घटना कोचूर रोडवर असलेल्या बेंडाळे यांच्या शेतात घडली.
आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शोभाराम बारेला यांचा मृतदेह आढळून आला असून मृतदेहावरच दगड पडलेला असल्यामुळे दगडाने ठेचून त्यांना संपविण्यात आल्याचे दिसून आले आहे. याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पार्थिव हे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून पोलिस स्थानकात नोंद करण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे परिसर हादरला आहे