जळगाव मिरर | २७ सप्टेंबर २०२४
गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु असतांना नुकतेच नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज अतिजोरदार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये जोरदार, मुंबईत मध्यम, नगर, जळगावमध्ये हलका ते मध्यम, पुणे, साताऱ्यात जोरदार तर विदर्भात केवळ ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे.
दुसरीकडे मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या भागावर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली असून हवेच्या कमी दाबाचा द्रोणिय पट्टा विदर्भ, छत्तीसगड, झारखंड ते बांगलादेशपर्यंत पसरला आहे. त्यामुळे राज्यात परतीच्या पावसाला अनुकूल वातावरण असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. नाशिक, पालघर, रत्नागिरी, वर्धा जिल्ह्यात गुरुवारी देखील जोरदार पाऊस झाला. त्यामुळे राज्यातील पिण्याचा प्रश्न प्रश्न मिटला आहे. आजही अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशत: ढगाळ राहून मेघगर्जनेसह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातील ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग आणि इतर परिसरात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह 7 जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळतील. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नंदूरबार, धुळे, तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे.