जळगाव मिरर | १ नोव्हेबर २०२३
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना आता जळगाव शहरातील एका महाविद्यालयातील ग्रंथालय परिचराने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विद्यार्थिनीने रामानंद नगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरात आपल्या आजीकडे राहायला असलेली २० वर्षीय तरुणी शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे. २६ ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा झाल्यानंतर ही विद्यार्थिनी ग्रंथालयात पुस्तक जमा करण्यासाठी गेली. तेथे ग्रंथालय परिचर कैलास कडभाने याने दुसऱ्या दिवशी परीक्षा असलेल्या विषयाचे पुस्तक घेऊन जाण्याविषयी आग्रह केला. त्यास विद्यार्थिनीने नकार दिला तरी तो वारंवार पुस्तक नेण्याविषयी तिला सांगत होता. तेथे ही विद्यार्थिनी सही करीत असताना कडभाने याने तिला स्पर्श केला. चुकीने धक्का लागला असेल म्हणून विद्यार्थिनीने दुर्लक्ष केले. ग्रंथालयातून जात असताना कडभाने याने तिचे बोट पकडून दरवाजा मागे ओढले व तिचा विनयभंग केला. घाबरलेल्या अवस्थेत तिने कशीतरी सुटका करून घेत घर गाठले व आजीला हकीकत सांगितली. नंतर विद्यार्थिनीने शिक्षिकेलाही याची माहिती दिली. त्यानुसार मंगळवार ३१ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी रामांनद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून कैलास कडभाने याच्याविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.