
जळगाव मिरर । २५ सप्टेंबर २०२५
जामनेर तालुक्यातील पळसखेडा येथील जैन इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळेबाबत पालकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींचा विचार करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी या शाळेची मान्यता आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या आदेशानुसार रद्द करण्यात आली आहे. या शाळेत शिक्षण घेणाऱ्या २८८ विद्यार्थ्यांचे समायोजन इतर नामांकित शाळांमध्ये करण्यात आले आहे.
यामध्ये दुसरीतील ३० विद्यार्थ्यांचे समायोजन लिटील टॉली प्री-प्रायमरी व बालविकास प्रायमरी, कासोदा (ता. एरंडोल) येथे करण्यात आले आहे. तर तीसरीतील ४८ विद्यार्थी मिमोसा इंग्लिश मिडीयम स्कूल, चोपडा येथे समायोजन करण्यात आले आहेत. तसेच, चौथीमधील २९ विद्यार्थ्यांचे समायोजन सुरेशचंद बी. संचेती इंटरनॅशनल स्कूल, उत्राण ता. एरंडोल येथे तर पाचवीतील ४४ व सातवीतील ९७विद्यार्थी त्रिमूर्ती पब्लिक स्कूल, शेवगाव तर नेवासा, जि. अहिल्यानगर येथे तर नववीतील ४० विद्यार्थी बियाणी इंग्लिश मिडीयम स्कूल, भुसावळ येथे समायोजन करण्यात आले आहेत.
याप्रमाणे एकूण २८८ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता तात्काळ समायोजन पूर्ण करण्यात आले आहे. पालकांनी आपल्या मुलांचे तात्काळ प्रवेश समायोजित शाळांमध्ये करून घ्यावे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी सर्व आवश्यक सुविधा संबंधित शाळांमध्ये नियमितपणे सुरु राहतील. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित हा या निर्णयाचा मुख्य उद्देश असून पालकांनी यात सहकार्य करावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांनी केले आहे.




















