जळगाव मिरर | २ सप्टेंबर २०२३
स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात अग्रगण्य असलेल्या दर्जी फाऊंडेशन तर्फे एम.पी.एस.सी.मधून सहाय्यक संचालक गट-ब पदी निवड झालेल्या पवन मुक्ताजी सोनुने यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगा तर्फे औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागात सहाय्यक संचालक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा अंतीम निकाल नुकताच जाहिर झाला. या अंतीम निकालामध्ये पवन मुक्ताजी सोनुने हे यशस्वी झालेले असून एन.टी-ड संवर्गातून महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत. या घवघवीत यशाबद्दल पवन सोनुने यांचा परिवारासह सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा.गोपाल दर्जी यांच्यासह सौ.ज्योती दर्जी, डॉ.अशोक पाटील, सौ.जया पाटील, सौ.पुष्पा पाटील, सौ.सिमा सोनुने, लावण्या सोनुने आणि विद्यार्थी उपस्थित होते.
पवन सोनुने हे महाजेनकोच्या दिपनगर कार्यालयात सध्या उपकार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहे. शासकीय विभागात अधिकारी होण्याचे स्वप्न असल्याने त्यांनी एम.पी.एस.सी.ची उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य या पदासाठी परीक्षा दिलेली होती. संपूर्ण महाराष्ट्रात फक्त 44 पदे असतांना यामध्ये दर्जी फाऊंडेशनमधील प्रा.गोपाल दर्जी यांच्या मार्गदर्शनामुळे पवन सोनुने यांनी यशस्वी बाजी मारलेली आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकरिता दर्जी फाऊंडेशन हे महत्वाचे व्यासपीठ आहे. येथील गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थी यशस्वी होत आहेत. या यशामुळे बेरोजगार तरूणांना कायमस्वरूपी शासकीय रोजगार मिळत असून दर्जी फाऊंडेशनचे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. असे मत पवन सोनुने यांनी व्यक्त केले. एम.पी.एस.सी.तील यशाबद्दल पवन सोनुने यांचे प्रा.गोपाल दर्जी यांच्यासह सौ.ज्योती दर्जी यांनी अभिनंदन केले.