
जळगाव मिरर | २५ मे २०२६
रुग्णसेवेत दिवस-रात्र कार्यरत असणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या आरोग्य सुरक्षेसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. ‘महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स’ आणि ‘जनऔषधवैद्यकशास्त्र विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने निवासी डॉक्टर आणि इंटर्नसाठी दि. १८ मे ते २२ मे २०२६ दरम्यान मोफत ‘हेपेटायटिस-बी’ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, सुमारे १०० हून अधिक निवासी डॉक्टर आणि इंटर्न यांनी या लसीकरणाचा लाभ घेतला.
वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना डॉक्टरांचा रुग्ण, त्यांचे रक्त आणि इतर शारीरिक द्रव्यांशी सतत संपर्क येत असतो. त्यामुळे त्यांना ‘हेपेटायटिस-बी’ सारख्या घातक संसर्गाचा धोका अधिक असतो. हीच जोखीम लक्षात घेऊन डॉक्टरांना सुरक्षितता प्रदान करण्याच्या उद्देशाने या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेच्या समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर तसेच जनऔषधवैद्यकशास्त्र विभाग प्रमुख व वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बाविस्कर प्रामुख्याने उपस्थित होते.
अधिष्ठातांनी ‘मार्ड’च्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आणि भविष्यातही डॉक्टरांच्या हितासाठी असे विविध उपक्रम राबवण्यास प्रोत्साहित केले.
या यशस्वी मोहिमेचे आयोजन ‘मार्ड’चे अध्यक्ष डॉ. आदित्य बिहानी, उपाध्यक्ष डॉ. उत्कर्ष वशिष्ठ, सरचिटणीस डॉ. यशश्री चौधरी आणि डॉ. प्रमय व्यास यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. तसेच लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या पार पाडण्यात परिसेविका सुलभा नाईक, अधिसेविका संगिता शिंदे आणि सहाय्यक अधिसेवक तुषार पाटील यांचे मोलाचे योगदान लाभले.
‘MARD GMC जळगाव’ हे केवळ निवासी डॉक्टरांच्या हक्कांसाठीच नाही, तर त्यांच्या आरोग्य, सुरक्षा आणि कल्याणासाठी कटिबद्ध आहे. आगामी काळातही डॉक्टरांच्या हितासाठी आणि आरोग्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती ‘मार्ड’चे प्रवक्ते डॉ. यश सिसोदे आणि डॉ. प्रियंका गुंटुकुला यांनी दिली.
“निवासी डॉक्टर आणि इंटर्नच्या आरोग्याची काळजी घेणे हे आमचे कर्तव्य आहे. अशा प्रतिबंधात्मक उपक्रमांमुळे डॉक्टरांना सुरक्षित वातावरणात काम करण्याचे बळ मिळते.”
— डॉ. गिरीश ठाकूर, अधिष्ठाता





















