जळगाव मिरर | १८ मार्च २०२४
देशात लोकसभा निवडणूक घोषित झाली असतांना अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नुकतेच महाविकास आघाडीची सभा मुंबईत झाली. तर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी शिंदे सरकारच्या कार्यकाळ आणि कामांवर भाष्य केले तसेच कालच्या इंडिया आघाडीच्या सभेवर जोरदार टीका केली.
“शेतकरी, युवकांचा रोजगार आणि उद्योग यामध्ये महाराष्ट्र सध्या पुढे आहे. कोस्टल रोड, मेट्रो, अटल सेतू, अशी अनेक कामे आजही प्रगती पथावर आहेत. मात्र हेच प्रकल्प याधीच्या सरकारमध्ये रखडले होते. आज केंद्र आणि राज्यसरकारच्या डबल इंजिन सरकारने अनेक कामांना प्राधान्य दिले. कॅबिनेट बैठकीतून ५५ लोकहिताचे निर्णय आम्ही हाती घेतले ते निर्णय तुमच्यासमोर आहेत. झालेली कामे पाहता मी समाधानी आहे,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
“कालची सभा ही फॅमिली गॅदरिंग होती. नैराश्येने ग्रासलेले लोक, जनतेने तडीपार केलेले लोक एकत्र आले होते. ते धरून बांधून एकत्र आलेत. सावरकरांच्या स्मारकासमोर आणि बाळासाहेब यांच्या स्मृतीस्थळासमोर ही सभा झाली हा काळा दिवस होता. ज्यांच्या विरोधात लढले त्यांच्यासोबत बसले. उद्धव ठाकरे यांनी खरी बाळासाहेबांची माफी मागायला हवी,” असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी इंडिया आघाडीवर टीका केली.
तसेच “विजय शिवतारे भेटले मी त्यांना युती धर्म पाळण्यास सांगितले आहे. महायुतीत सर्व शिवसैनिक जो उमेदवार देतील तो निवडून आणणार आहोत. जागा वाटप समन्वयाने होईल, योग्य वेळी निर्णय होईल ४५ जागा पार होईल, असे म्हणत मोदींजींचे ४०० पारचे स्वप्न पुर्ण करु..” असेही एकनाथ शिंदे म्हणाले.