जळगाव मिरर | २० जुलै २०२६
राज्याचे मंत्री ना. गिरीश महाजन यांचे एका महिलेसोबतचे बनावट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करीत फोटो व्हायरल करणाऱ्या भरत बालाजी म्हस्के (वय ३४, रा. गोंदी खुर्द, ता. गेवराई, जि. बीड) याला ताब्यात घेतले आहे. त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांचे एका महिलेसोबत बनावट फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी भरत बालाजी म्हस्के नामक फेसबुक धारकाविरुद्ध दि. १९ जून रोजी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात जळगावात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात संबंधिताचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार उपनिरीक्षक मुस्तफा मिर्झा, पोहेकॉ हेमंत महाडीक, पोलिस नाईक सचिन सोनवणे, पोकॉ निखील नारखेडे, सुधीर भंडारे यांनी तांत्रिक विश्लेषण करीत भरत म्हस्के याचा पाठलाग केला. त्याला इंदापूर, जि. पुणे येथून ताब्यात घेतले. संशयिताने गुन्ह्याची कबुली दिली आहे. संबंधिताला नोटीस देण्यात आली असून लवकरच न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्याचे काम सुरू आहे.
भरत म्हस्के याने व्हायरल केलेले फोटो सहयोग पोर्टलद्वारे डिलीट करण्यात आले आहेत. तसेच दि. १९ जुलै रोजी म्हस्के याचे सोशल मिडीयावर सहा हजार फॉलोअर्स आहेत. त्याचे फेकबुक खाते कायमचे सस्पेंड करण्यात आले आहे.




















