जळगाव मिरर | ७ जानेवारी २०२५
जळगाव येथील न्यायालयात सोमवारी, ६ जानेवारी रोजी पक्षनेता सुनील सुपडू महाजन यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी झाली. न्यायाधीश न्या. वावरे यांनी महाजन यांचे तिन्ही गुन्ह्यातील अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले. तर, संशयित भावेश पाटील यांच्यावर दाखल असलेल्या दोन्ही गुन्ह्यात न्यायालयाने जामीन मंजूर केला. यापूर्वी पाटील यांना आणखी एका गुन्ह्यात जामीन मंजूर झाला होता.
शहरातील पाणीपुरवठा करणाऱ्या बिडाच्या पाईप चोरी प्रकरणात महाजन यांच्यासह ७ जणांविरुद्ध तीन गुन्हे दाखल आहेत. रामानंद नगर पोलीस ठाण्यात १ तर तालुका पोलीस ठाण्यात २ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत ४ जणांना अटक करण्यात आली असून, उर्वरित संशयित अद्याप फरार आहेत.
मुख्य संशयित महाजन यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सोमवारी न्यायालयात सुनावणी झाली, आणि दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकून न्या. वावरे यांनी महाजन यांच्या जामिन अर्जाला नकार दिला. पोलिसांनी महाजन यांच्या मोबाईलचा सीडीआर तपासला असता, त्यामध्ये महाजन यांचे विविध व्यक्तींशी अनेक वेळा संवाद साधलेले आढळले. यामध्ये भंगार ठेकेदार सादीक खाटीकसोबत १४१ वेळा, अक्षय अग्रवालसोबत ७३६ वेळा, कुंदन पाटीलसोबत ५४७ वेळा आणि निरंजन पाटीलसोबत १०५७ वेळा संवाद झाला होता.
महाजन यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या तिन्ही गुन्ह्यांमध्ये अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केले होते. याशिवाय पाईप चोरी प्रकरणातील इतर संशयित सादीक खाटीक, कुंदन पाटील आणि भावेश पाटील यांच्या जामीन अर्जावर देखील न्यायालयात युक्तिवाद झाला. महाजन यांच्या वतीने अॅड. जैनोद्दीन शेख आणि अॅड. सागर चित्रे यांनी बाजू मांडली, तर पाटील यांच्या वतीने देखील अॅड. शेख यांनी कामकाज केले. सरकारी वकील अॅड. सुरेंद्र काबरा यांनी या प्रकरणात सरकारकडून बाजू मांडली.