जळगाव मिरर | ८ जानेवारी २०२५
छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल ओबीसी समाजाच्या वतीनं संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर ओबीसी समाजाने एक निदर्शन आंदोलनही आयोजित केलं. या आंदोलनात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत विविध आरोप केले.
लक्ष्मण हाके यांनी आपल्या भाषणात असं म्हटलं की, “संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या बरोबर पुण्यात राजगुरूनगरमध्ये दोन मुलींची हत्या झाली होती. महाराष्ट्रात गुन्हेगारांची जात शोधून त्यांना आरोपीच्या कठड्यात उभं करण्यात येतं. आता भाजप आमदार सुरेश धस हे मनोज जरांगे यांचीच भाषा बोलू लागले आहेत.”
सुरेश धस यांच्या वर्तमनातील वक्तव्यानंतर हाके यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आरोप केला की, “सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारण केलं आहे. एक निवडून आलेला आमदार आपल्या पक्षाच्या नेत्यावर टीका करत आहे. जेव्हा अंतरवाली सराटीमध्ये गोळीबार झाला, त्यावेळी बीडमध्ये जाळपोळ झाली, त्यावेळी सुरेश धस यांना बंदुकी दिसल्या नाहीत का?”
तसेच हाके पुढे म्हणाले, “धनंजय देशमुख यांनी सांगितलं होतं की, संतोष देशमुख यांची हत्या जातीयवादातून झाली नाही. पण सोळंके आणि क्षीरसागर यांचे घर जाळले गेलं, त्यावेळी ओबीसी समाज धावून आला होता. फडणवीस साहेब, तुमच्या पक्षातील एक व्यक्ती गृहविभागावर प्रश्न निर्माण करत आहे. ज्या वाल्मिक कराडचे फोटो धनंजय मुंडे सोबत आहेत, त्यांचे फोटो शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुरेश धस यांच्या सोबत देखील आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी तुम्हाला वाल्मिक आण्णा हवेत, पण जर तुम्ही जात पाहून अधिकारी बाजूला करत असाल, तर आम्हीही जात काढावी का?” सुरेश धस आणि मनोज जरांगे यांच्या भूमिका आणि कार्यवाहिकांवर लक्ष्मण हाके यांनी गंभीर आरोप करत म्हटलं की, “या गंभीर घटनेचे सुरेश धस आणि मनोज जरांगे यांनी महत्व कमी केलं आहे.”