जळगाव मिरर | १२ डिसेंबर २०२४
विनापरवाना अवैधरित्या वाहनात गोवंशाना कोंबून त्यांची निर्दयीपणे वाहतुक करणाऱ्यांवर शनिपेठ पोलिसांनी दि. १० रोजी सकाळच्या सुमारास भिलपुरा चौकात कारवाई केली. याप्रकरणी संशयित शेख जमील शेख अब्दुल रहमान कसाई (वय २५, रा. सानेगुरुजी वसाहत, चोपडा) या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील भिलपुरा चौकातून (एमएच १९, सीवाय ०९६) क्रमांकाच्या वाहनातून गोवंशाची वाहतुक होत असल्याची माहिती शनिपेठ पोलीसांना मिळाली. त्यानुसार इंदल जाधव यांच्यासह कर्मचाऱ्यांनी गोवंशाची वाहतुक करणारे वाहन थांबवले. त्यांनी वाहनाची तपासणी केली असता, त्यांना दोन बैल वाहनात निर्दयीपणे कोंबून त्यांची कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतुक केल्याचे आढळून आले. तसेच त्यांच्याकडे बैलांच्या तपासणीबाबतचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र देखील नव्हते. पोलिसांनी त्या बैलांची सुटका करीत संशयिताला पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ योगेश माळी हे करीत आहे.