
जळगाव मिरर | २८ एप्रिल २०२६
पाचोरा शहरातील सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांविरुद्ध पाचोरा पोलिसांनी कडक भूमिका घेत मोठी कारवाई केली आहे. २४ एप्रिल रोजी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तब्बल २५ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली. २४ एप्रिल रोजी सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत पाचोरा शहरातील विविध भागांमध्ये पोलिसांनी अचानक छापे टाकले. या कारवाईदरम्यान सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करताना आढळलेल्या २५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या सर्व व्यक्तींना पाचोरा पोलिस ठाण्यात आणून त्यांच्यावर महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. संबंधितांविरुद्ध पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे.
ही कारवाई पाचोरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने पार पाडली. शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून नागरिकांना त्रास देणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही, असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे. नागरिकांनी कायद्याचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





















