जळगाव मिरर | ११ नोव्हेंबर २०२५
छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेडच्या चाळीसगाव शाखेची तब्बल ५ कोटी ३३ लाख ८५ हजार ३५६ रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि माजी खासदार उन्मेष भैय्यासाहेब पाटील यांच्यासह चौघांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे चाळीसगाव व जिल्ह्यात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
देवगिरी बँकेच्या चाळीसगाव शाखेचे व्यवस्थापक जीवन राजूरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उन्मेष पाटील, संजय धनकवडे, प्रशांत वाघ आणि प्रमोद जाधव या चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, उमंग व्हाईट गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाने औद्योगिक कर्ज घेण्यात आले होते. हे कर्ज काही काळानंतर एनपीए झाले. बँकेकडून वारंवार परतफेडीसाठी संधी देऊनही रक्कम जमा करण्यात आली नाही. त्यानंतर बँकेने वसुलीची प्रक्रिया सुरू केली. मात्र, या काळात बँकेकडे गहाण ठेवलेली मशिनरी कंपनीच्या संचालकांनी संगनमताने विकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कृतीमुळे बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित चार जणांविरुद्ध फसवणूक, विश्वासघात आणि संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणामुळे चाळीसगाव परिसरासह राजकीय क्षेत्रात मोठी चर्चा रंगली आहे.



















