जळगाव मिरर | ४ एप्रिल २०२५
राज्यातील पुणे शहराती बहुचर्चेत दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. गर्भवती महिलेला असह्य वेदना सुरू झाल्याने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रशासनाने सांगितलेली संपूर्ण रक्कम एकदम भरणे शक्य नसल्याने गर्भवतीला वेळेत उपचार मिळाले नाहीत.
गर्भवतीला नातेवाइकांनी तातडीने दुसर्या रुग्णालयात हलवले. तिने जुळ्या बाळांना जन्म दिला. मात्र, गर्भवतीचा दुर्दैवी मृत्यू झाला. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे गर्भवतीचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा ऊर्फ ईश्वरी भिसे यांच्याबाबत हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. याबाबत राजकीय व्यक्ती तसेच सामान्यांमधून सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. रुग्णालय प्रशासनाने थोडासा मानवीय द़ृष्टिकोन दाखवला असता तर आज तनिषा भिसे आपल्या जुळ्या बाळांना मातृत्व देण्यासाठी हयात राहिल्या असत्या.
सत्ताधारी आमदारांच्या निकटवर्तीयांची ही अवस्था असेल तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांचे जगणे किड्या, मुंग्यांपेक्षाही बदतर होत आहे, ज्याची कल्पनाच न केलेली बरी, अशा शब्दांत शिवसेना (उध्दव ठाकरे गट) प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. राज्याचे विधी व न्याय राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय येथे झालेल्या दुर्घटनेची गंभीर दखल घेतली असून, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे. यासंदर्भात विधी व न्याय खात्यांतर्गत एक समिती गठित करण्यात येणार असून, ही समिती घटनेचा संपूर्ण आढावा घेणार आहे.
तसेच पुणे शहर आणि जिल्ह्यातील धर्मादायअंतर्गत नोंदणीकृत असलेल्या सर्व रुग्णालयांची झाडाझडती घेणार आहे. निर्धन घटकातील रुग्णांसाठी तसेच आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांसाठी आरक्षित असलेल्या बेडवर मोफत किंवा 50 टक्के सवलतीच्या दरात उपचार केले जात आहेत की नाही? याचा सविस्तर आढावा ही समिती घेईल.