जळगाव मिरर | २ जानेवारी २०२५
राज्यातील अनेक शहरातून धक्कादायक घटना उघडकीस येत असतांना नुकतेच कोल्हापूर जिल्ह्यातून एक घटना समोर आली आहे. कोल्हापूरातील कसबा बावडा या भागात एका आजोबांना हृदय विकाराचा झटका आल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर त्यांच्या घरी अंत्यविधीची तयारी झाली. परंतु, रुग्णवाहिकेने घरी आणताना खड्ड्यांमुळे बसलेल्या दणक्याने आजोबा पुन्हा जिवंत झाले. आजपर्यंत अनेकांसाठी जीवघेणे ठरलेले रस्त्यावरील खड्डे आजोबांसाठी जीवदान देणारे ठरल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वारकरी संप्रदायातील पांडुरंग उलपे हे १६ डिसेंबर रोजी सायंकाळी हरिनामाचा जप करत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांची परिस्थिती पाहून घरच्यांनी त्यांना लगेच रुग्णालयात दाखल केले. रात्री साडे अकरापर्यंत डॉक्टरांचे प्रयत्न सुरू होते. पण अखेर पांडुरंग यांची प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. पांडुरंग उलपे यांच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर जवळचे पाहुणे, नातेवाईक, गावकरी त्यांच्या घरी जमले. सर्वांनी पांडुरंग उलपे यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू केली.
रुग्णालयातून पांडुरंग उलपे यांचे पार्थिव अँम्ब्युलन्सने नेत असताना रस्त्यावरील खड्ड्यामुळे अँब्युलन्सला चांगलाच दणका बसला. या दणक्यानंतर त्यांची हालचाल होत असल्याचे रुग्णवाहिकेतील नातेवाईकांच्या लक्षात आले. डॉक्टरांनी मृत घोषित केलेले पांडुरंग उलपे पुन्हा जिवंत झाले होते. यानंतर नातेवाइकांनी त्यांना पुन्हा रुग्णालयात नेले. तेथे तात्यांवर पुन्हा उपचार करण्यात आले. त्यांच्या शरीरानेही उपचारांना प्रतिसाद दिला. उपचारानंतर पांडुरंग उलपे आपल्या पायावर उभे राहून घराकडे चालत आले. सोमवारी त्यांना रूग्णालयातून घरी सोडले. मृत्युच्या दारातून परत आलेल्या पांडुरंग उलपे यांचे कुटुंबीयांनी जोरदार स्वागत केले. त्यांच्या स्वागतासाठी फुले अंथरण्यात आली होती.