जळगाव मिरर / २५ फेब्रुवारी २०२३ ।
गेल्या काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लाचखोरीचे प्रमाण वाढले असून याला आळा घालण्यासाठी जळगाव एसीबीचे पथक सातत्याने कार्यरत आहे. या कारवाईमध्ये महसूलसह पोलीस विभागातील कर्मचारीवर कारवाई होत आहे. अशीच घटना पुन्हा जळगाव जिल्ह्यात घडली आहे.
बोदवड तालुक्यातील खंडणीच्या गुन्ह्यात मदत करण्यासह चॅप्टर केस एलसीबीऐवजी स्थानिक स्तरावर करण्यासाठी २० हजारांची लाच मागून तडजोडीअंती १६ हजारांची लाच स्वीकारणार्या पंटरासह बोदवडमधील हवालदारास जळगाव एसीबीच्या पथकाने अटक केली आहे. दि २५ फेब्रुवारी शनिवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास बोदवड तहसील कार्यालयाच्या आवारात हा सापळा यशस्वी करण्यात आला. हवालदार वसंत नामदेव निकम व खाजगी पंटर एकनाथ कृष्णा बाविस्कर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
बोदवडमधील तक्रारदारासह त्याच्या तीन मित्रांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल असून त्यात सी फायनल न्यायालयात पाठवण्यासाठी तपासाधिकारी असलेल्या हवालदार वसंत निकम यांनी प्रत्येकी पाच हजारांप्रमाणे 20 हजारांची लाच मागितली होती मात्र चार हजार प्रत्येकी देण्याचे ठरल्यानंतर एसीबीकडे तक्रार करण्यात आली. शनिवारी सकाळी 11.30 वाजता तहसील कार्यालयाच्या आवारात निकम यांनी पंटर बाविस्कर याच्याकडे लाच रक्कम देण्याचे सांगितल्यानंतर पंटराने लाच स्वीकारताच हवालदाराला अटक करण्यात आली. जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक संजोग बच्छाव व सहकार्यांनी हा सापळा यशस्वी केला.