जळगाव मिरर | ३ ऑगस्ट २०२४
ड्यूटी संपल्यानंतर घरी परतत असताना धावत्या रेल्वेतून पडल्याने चंद्रकांत आनंदा मराठे (५६, रा. राधाकृष्ण नगर) हे रेल्वे रुग्णालयातील कर्मचारी ठार झाले. ही घटना शुक्रवारी (२ ऑगस्ट) असोदा ते भादली दरम्यान उघडकीस आली. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील राधाकृष्ण नगरातील रहिवासी चंद्रकांत मराठे हे भुसावळ येथील रेल्वे रुग्णालयामध्ये नोकरीस होते. १ ऑगस्ट रोजी ते ड्यूटी आटोपन दपारी तीन वाजेच्या सुमारास रेल्वेने घरी येत होते. त्यावेळी असोदा ते भादली दरम्यान खांबा क्रमांक ४२७/२४ ते ४२७/२६ दरम्यान ते धावत्या रेल्वेतून पडले व त्यांचा मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत चंद्रकांत मराठे घरी न परतल्यामुळे कुटुंबियांनी त्यांच्या मोबाईलवरुन संपर्क साधला. मात्र कुठलाही प्रतिसाद मिळत नव्हता. रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यावेळी मराठे हे रेल्वेत चढताना दिसले, मात्र जळगाव रेल्वे स्थानकावर ते उतरताना दिसत नव्हते. सकाळी गँगमनला असोदा ते भादली दरम्यान मृतदेह दिसला.