जळगाव मिरर | २३ जुलै २०२४
गेल्या काही दिवसापासून देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस सुरु असून राज्यात देखील पावसाचा हाहाकार सुरु असून मुंबई, कोकणात जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. त्यातच आज देखील तब्बल २३ जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर येत्या चार दिवसांत देखील राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. मराठवाडा, विदर्भ, कोकणात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
रत्नागिरी, सातारामध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूरमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय मुंबई, पालघर, ठाणे, नाशिकमध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट, तर नंदुरबार, धुळे, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये विजांसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
पुढील चार दिवस राज्यातील काही भागात चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. बुधवारी रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला. तसेच सिंधुदूर्ग, रायगड, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला. तसेच विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट आहे. नाशिक, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातही यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.
गुरुवारी आणि शुक्रवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रीतील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस राहू शकतो. तसेच पूर्व विदर्भातही काही ठिकाणी जोरदार सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. त्यामुळे 4 दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.