जळगाव मिरर | १७ नोव्हेंबर २०२५
आज स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भावनिक संदेश जारी केला आहे. सोशल मीडियावर केलेल्या या पोस्टमध्ये त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचे स्मरण करताना त्यांची राजकीय भूमिका, हिंदुत्त्व या विषयावरील दृष्टीकोन आणि समाजकारणाला दिलेले प्राधान्य यावर प्रकाश टाकला. परंतु या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे बाळासाहेबांनी उभा केलेला वारसा कोणाचा? या प्रश्नावर राजकीय संघर्ष अधिकच तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये बाळासाहेबांची ओळख केवळ शिवसेना प्रमुख म्हणून नाही, तर भाषिक अस्मितेवर मोठी चळवळ उभारणारे नेते म्हणून केली. त्यांनी म्हटले की, देशाच्या इतिहासात भाषिक ओळख आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात राजकीय चळवळ चालवणारे आणि त्या चळवळीतून राजकीय पक्ष निर्माण करणारे बाळासाहेब एकमेव होते. त्याचबरोबर हिंदू अस्मितेला बळकटी देण्याचे कामही बाळासाहेबांनी त्या काळात केले, जेव्हा देशात कमंडलवाद वाढू लागला नव्हता. राज यांच्या या विधानातून त्यांनी हिंदू राजकारणाची मुळे शिवसेनेनेच रुजवली, अशी भूमिका मांडल्याचे स्पष्ट होते.
आपल्या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या हिंदू राजकारणाचे वेगळेपणही अधोरेखित केले. त्यांनी म्हटले की, बाळासाहेबांनी कधीही हिंदूंना व्होटबँक म्हणून पाहिले नाही. त्यांच्या दृष्टीने हिंदुत्व हा विषय श्रद्धा, अस्मिता आणि धर्माबद्दलच्या प्रेमाचा होता. त्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे यांचा तर्कवादही दिसते. बाळासाहेबांची हिंदूप्रेमी भूमिका असूनही त्यांची चिकित्सक वृत्ती कधीच कमी झाली नाही, असेही राज यांनी नमूद केले. पुढे त्यांनी असेही म्हटले की, आज बाळासाहेबांच्या प्रतिमेचा वापर करून हिंदुत्वाचे वारस असल्याचा दावा करणाऱ्यांना ना बाळासाहेब माहिती आहेत, ना प्रबोधनकार. वाचण्याची, ऐकण्याची सवय नसल्यामुळे या नेत्यांना ठाकरे कुटुंबाच्या विचारांची खोली मुळीच कळत नसल्याची टीका राज ठाकरेंनी केली.
राज ठाकरे यांनी केलेली पोस्ट देखील पहा…
शिवसेना पक्षाचे संस्थापक, हिंदुहृदयसम्राट आणि माझे काका स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी. देशाच्या इतिहासात भाषिक अस्मितेच्या जोरावर एक प्रचंड चळवळ निर्माण करून त्यातून एका राजकीय पक्षाला जन्म देणारे बाळासाहेब. आणि पुढे जातीय अस्मिता तीव्र होण्याच्या काळात आणि भारतीय जनता पक्षाचा कमंडलवाद फोफावायच्या आधी हिंदू म्हणून अस्मिता जागी करणारे बाळासाहेबच.
पण म्हणून बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून नाही पाहिलं. त्यांच्यासाठी हा विषय अस्मितेचा होता, धर्माप्रतीच्या प्रेमाचा होता. आणि हे करताना बाळासाहेबांनी, प्रबोधनकारांकडून आलेला तर्कवाद पण सोडला नाही. बाळासाहेब हे कमालीचे हिंदुप्रेमी होते, पण म्हणून त्यांच्यातली चिकित्सक वृत्ती लोप पावली नाही. त्यामुळे बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची किंवा त्यावर मतं मागणाऱ्यांची गंमत वाटते. ना त्यांना बाळासाहेब माहित आहेत, ना त्यांना प्रबोधनकार माहित आहेत, ( अर्थात ऐकणं आणि वाचणं यांचा दुष्काळ असल्यामुळे ) त्यामुळे त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची झालेली मशागत किती समृद्ध होती ह्या पुसटशी देखील कल्पना नाही !
फक्त मतं, सत्ता मिळवणे आणि ती सत्ता मिळाल्यावर वाट्टेल तसं ओरबाडणं म्हणजे राजकारण हे रूढ होत असताना, समाजकारण आधी आणि मग राजकारण हे आमच्या विचारात रुजवणाऱ्या बाळासाहेबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र अभिवादन!




















