जळगाव मिरर | २४ ऑक्टोबर २०२५
शाहिरी क्षेत्र संघटन, सार्वजनिक कार्य व पत्रकारिता अशा माध्यमातून ज्यांनी आपले आयुष्य साठ वर्षांहून अधिक काळ निरलस वृत्तीने समर्पित केले त्या रमेश कदम यांना पहिला खान्देश रत्न’राष्ट्रशाहीर सिद्राम बसाप्पा मुचाटे जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
खान्देश लोककलावंत विकास प्रतिष्ठान जळगाव ह्या संस्थेच्या वतीने लोकविधायक सेवावृत्तींना हा पुरस्कार प्रतीवर्षी दिला जाणार असून त्याचे स्वरूप रूपये एक्कावन्न हजार,शाल, श्रीफळ, मानपत्र व सन्मानचिन्ह असे आहे,
रविवार ०२ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता, येथे अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद आणि खान्देश लोककलावंत प्रतिष्ठान यांचे संयुक्त विद्यमाने मराठी शाहीर लोककलाकार तसेच चलतचित्रण कलाकारांचे सम्मेलनाचे आयोजन जळगाव येथिल माजी सैनिक सभागृह, महाबळ मार्ग येथे करण्यात आले असून त्यात सदर पुरस्कार माननीय खा.स्मिताताई वाघ यांचे शुभहस्ते प्रदान केला जाईल.
आचार्य अत्रे व शाहीर अमर शेख ही श्रध्दास्थाने असणाऱ्या रमेश कदम यांची जडण घडण राष्ट्र सेवा दलात झाली. वयाच्या १२ व्या वर्षापासून लेखनास प्रारंभ, दैनिक मराठातील लेखन,वयाच्या २५ व्या वर्षी स्वतःचे ‘समर्पित’ साप्ताहिका द्वारे त्यानी प्रबोधन तथा अन्याय निवारणाची मोहीम राबवून ग्रामविकास युवकांची चळवळ स्त्री मुक्ती आंदोलनास सक्रिय सहाय्य केले. अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद, शाहीर अमरशेख पुरस्कार समिती, शाहीर साबळे प्रतिष्ठान, मराठी लोककला प्रतिष्ठान, भारतीय नृत्यकला प्रतिष्ठान, महानगर कामगार परिषद आदि संस्थांचे ते संस्थापक आहेत. शाहिरी अधिवेशन, अभ्यास शिबिर, कलावंन्तांचे प्रश्न सोडवणूकीसाठी व्यापक आंदोलन यासाठी त्यांचे योगदान नमूद पुरस्कारासाठी विचारात घेणेत आले
जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या लोककला संमेलनास खान्देशासह राज्यभरातील मोठ्या संख्येने शाहीर व चलतचित्रण कलावंत, लोककलावंत उपस्थित राहणार आहेत अशी माहिती खान्देश लोक कलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष व अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद आयोजित लोककला संमेलनाचे समन्वयक श्री विनोद ढगे यांनी दिली




















