जळगाव मिरर । १२ ऑक्टोबर २०२५
नात्याला काळिमा फासणारी घटना जळगाव शहरातील एका परिसरातून समोर आली आहे. घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत वाईट नजर ठेवून असलेल्या दीराने वहिनीवर अत्याचार केला. ही बाब विवाहितेने सासूसह पतीला सांगितली असता, त्यांनी ही बाब कोणाला सांगू नको अशी धमकी दिली. त्यानंतर देखील दि. १० रोजी संशयिताने वहिनीला जमिनीवर पाडून तिचा विनयभंग केल्याची ही संतापजनक घटना शहरात घडली आहे. याप्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरुन पती, दीरासह सासूविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एका परिसरात विवाहिता कुटुंबियांसह वास्तव्यास असून त्यांच्या पतीला दारुचे व्यसन असल्याने ते कामधंदा करीत नाही. विवाहितेचा दीर हा गेल्या दोन वर्षांपासून विवाहितेवर वाईट नजर ठेवून होता. २०२४ मध्ये ऑगस्ट महिन्यात घरात कोणीही नसतांना विवाहितेचा दीर हा घरात आला आणि कोणीही नसल्याचा फायदा घेत त्याने विवाहितेवर जबरदस्तीने अत्याचार केला. हा प्रकार विवाहितेने पतीला सांगितल्यानंतर त्याने अशा फालतू गोष्टी मला सांगू नको, तुला पटत असेल तर इथे रहा नाही तर मुलगा घेवून निघून जा असे सांगितले. त्यानंतर विवाहितेने ही बाब सासूला सांगितल्यानंतर त्यांनी देखील विवाहितेला अशा गोष्टी मला सांगायच्या नाही तुला रहायच असेल तर रहा नाही तर निघूजा असे सांगितले. त्यानंतर देखील विवाहितेचा दीर हा तिच्यासोबत अंगलट येवून अश्लिल वर्तवणुक करीत होता.
वारंवार विवाहितेसोबत दीर अश्लिल वर्तन करीत असल्याने त्याला विवाहितेची सासू व पतीकडून साथ मिळत होती. या तिघांनी विवाहितेला कोणालाही काही सांगितल्यास आम्ही सर्वजण तुझ आयुष्य उद्धवस्त करुन टाकू अशी धमकी दिली. त्यामुळे विवाहिता मानसिक तणावात होत्या. विवाहिता या घरी असतांना सासूने तिच्यासोबत भांडण केले. त्यानंतर दीराने पुन्हा वहिनीला जमिनीवर पाडून तिच्यासोबत अश्लिल कृत्य करीत तिचा विनयभंग केला. दरम्यान, हा त्रास असह्य झाल्यामुळे विवाहितेने दि. १० रोजी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार विवाहितेच्या पतीसह सासू व दीराविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक संजय शेलार हे करीत आहे