जळगाव मिरर | ५ नोव्हेंबर २०२५
राज्यात सध्या स्थानिक निवडणुकीची सर्वत्र चर्चा सुरू असून सर्वच पक्षांनी आता जोरदार तयारी देखील सुरू केली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे. पण एकनाथ शिंदे हेच जनतेच्या मनातले मुख्यमंत्री आहेत, असे विधान विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे. सत्ताधारी महायुतीतील घटकपक्षांत धुसफूस असल्याच्या चर्चांनी महाराष्ट्रातले वातावरण तापले आहे. त्यातच गोऱ्हे यांनी हे विधान केल्यामुळे त्यातून भाजप विरुद्ध शिवसेना असे चित्र उभे राहण्याची शक्यता आहे.
नीलम गोऱ्हे यांच्या दाही दिशा नामक पुस्तकाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी बोलताना नीलम गोऱ्हे यांनी उपरोक्त विधान केले. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, मराठी भाषा विभागमंत्री उदय सामंत, अभिनेत्री निवेदिता सराफ, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी आदी उपस्थित होते.
यावेळी नीलम गोऱ्हे म्हणाल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आम्हाला आदर आहेच, पण लाडकी बहीण योजनेमुळे एकनाथ शिंदे हेच महिलांच्या मनातले मुख्यमंत्री आहेत. आज राजकारणात महिलांना स्थान मिळाले. पण त्यांच्या सुरक्षिततचे व सक्षमीकरणाचे काम अजून बाकी आहे. आरक्षण मिळाले, पण संरक्षण नाही. त्यासाठीचा संघर्ष अजून सुरू आहे. 1995 ते 2005 या कालखंडातील महिला चळवळीतील संघर्ष धोरणे व अनुभव पुस्तकात मांडले आहेत.
एकनाथ शिंदे यांनीही यावेळी शिवसेनेतील उठावाची माहिती देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, शिवसेनेत उठाव करून आम्ही गुवाहाटीला पोहोचलो. तेथून परत आलो. यातील वरची कथा सगळ्यांना माहिती आहे. पण या घटनाक्रमावर एखाद्याला पुस्तक लिहायचे असेल तर खरी कथा मलाच माहिती आहे. त्यासाठी माझ्याशीच बोलावे लागेल.
सध्या काहीजण राजकारणात दिशाहीन झाले आहेत. काही लोकांची आपल्यावर वाईट नजर आहे. पण बुरी नजर वाले तेरा मुंह काला, विधानसभा में धो डाला, अब पालिका इलेक्शन में पडेला फिर से पाला. लेकिन महायुती के गेले में ही पडेगी विजय की माला, असा टोला शिंदे यांनी यावेळी विरोधकांना विशेषतः उद्धव ठाकरे यांना हाणला.
यावेळी त्यांनी नीलम गोऱ्हे व त्यांच्या पुस्तकाचे कौतुकही केले. ते म्हणाले, समाजात अन्याय दिसला की, तिथे धावून जाणे, दुर्बलांना आधार देत विकासाचा मार्ग दाखवणे या तत्त्वाचे गोऱ्हे जिवंत उदाहरण आहेत. त्यांनी लिहिलेले दाही दिशा हे पुस्तक त्यांच्या संघर्षाचा, विचारांचा नकाशा आहे. त्यांचा संघर्ष, संवेदनशीलता व समाजसेवेच्या प्रवासाचा हा प्रेरणादायी दस्तऐवज आहे. हा केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक जागृतीचा प्रवास आहे. हे केवळ साहित्यिक काम नसून, महिलांच्या वंचितांच्या व शोषितांच्या आवाजाला दिशा देणारे कार्य आहे.



















