जळगाव : प्रतिनिधी
येथील सुभाष चौक मित्र मंडळ आणि स्वामी समर्थ केंद्राच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन रविवार दि. ४ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. यावेळी हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये आवर्तन म्हणण्यात आली. संपूर्ण चौक परिसर मंत्रमुग्ध आणि भक्तिमय झाला होता.
दरवर्षीप्रमाणे सुभाष चौक मित्र मंडळाच्या वतीने अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन स्वामी समर्थ केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले होते. यावेळी नेताजी सुभाषचंद्र चौकामध्ये भव्य मंडपाखाली शहरातील सुमारे ५ हजार नागरिकांनी उपस्थिती देऊन अथर्वशीर्ष पठण सामूहिकरीत्या म्हणत वातावरण भक्तिमय केले होते. सुरुवातीला श्री गणेश, भगवान महादेव, दुर्गामाता आणि स्वामी समर्थांची महाआरती करण्यात आली. त्यानंतर हर्षल व नेहा अग्रवाल या दांपत्याच्या हस्ते श्री गणेशाला दुग्धाभिषेक करण्यात आला. तसेच प्रवीण व योगिता बांगर या दांपत्याच्या हस्ते दुर्वाभिषेक करण्यात आला.
प्रसंगी भवानी माता मंदिराचे पंडित महेशकुमार त्रिपाठी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक अथर्वशीर्ष पठण तसेच धार्मिक विधी पार पडला. महामंडपाखाली भगवे झेंडे लावण्यात आले होते. तसेच घंटानाद, शंखनाद करण्यात आला. महाआरती झाल्यानंतर भाविकांना मोदकांचा महाप्रसाद देण्यात आला. यावेळी २१ भाविकांना लकी ड्रॉ द्वारे चांदीचा शिक्का आयोजकांच्या वतीने देण्यात आला. प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी समर्थ केंद्राचे विजय निकम, सुभाष चौक मित्र मंडळ अध्यक्ष श्रीकांत खटोड, उपाध्यक्ष मनीष अग्रवाल, कार्याध्यक्ष अलोक अग्रवाल उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अथर्वशीर्ष पठणाला मोठा प्रतिसाद मिळाला. हर्षल चव्हाण, महेश गोला, मयूर कासार, बापू कापडणे, हरीश चव्हाण, संजय पांडे, बबलू गहलोत यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.