
जळगाव मिरर | १६ मे २०२५
शहरातील तुकारामवाडी परिसरात ३ घरांवर पाटा, वरवंटा, कुंड्या, शस्त्रांनी हल्ला करत दुचाकींची तोडफोड केल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीनंतर अडीच ते तीनच्या दरम्यान घडली. त्यामुळे अर्धा ते पाऊण तास या परिसरात तणावाची स्थिती होती. सुरेश ओतारी यांच्या खून प्रकरणात सुरु असलेल्या वादातून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ६ संशयितांना गुरुवारी दुपारी ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी शारदा ठाकुर (वय ४०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सुरेश ओतारी खुनाच्या वादातून संशयित आरोपी स्वप्निल उर्फ गोलू ठाकुर, निशांत चौधरी, अरुण उर्फ टीनू गोसावी, मुन्ना पहिलवान, पारस सोनवणे, बेंडा अज्या, गौरव मिस्तरी आणि ५-६ तरुणांनी बुधवारी मध्यरात्रीनंतर हल्ला केला. त्यावेळी पती सुकलाल आणि दोन मुली घरात झोपले होते. दरवाज्यावर लाठ्या-काठ्या आणि दगडफेक केली. अर्धवट दरवाजा उघडला असता स्वप्निल ठाकुर आणि त्याचे साथीदार दुचाकीवर दिसले. गोलू ठाकूरने शिवीगाळ केली. त्यानंतर कल्पना बाविस्कर यांच्या घराचा दरवाजा तोडून आत घुसले आणि शिवीगाळ केली. तसेच दुचाकीची तोडफोड केली. नंतर सम्राट कॉलनीत सविता महाजन यांच्या घराच्या खिडकीची काच फोडली. याप्रकरणी स्वप्निल ठाकुर, निशांत चौधरी, अरुण गोसावी आदींवर गुन्हा दाखल झाला आहे.
तुकाराम वाडीतील हल्ल्याची माहिती मिळताच एमआयडीसीचे निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकातील हेड कॉन्स्टेबल गणेश शिरसाळे, किरण पाटील, राहुल घेटे, नितीन ठाकूर, गणेश ठाकरे यांना घटनास्थळी रवाना केले. पथकाने संशयित अरुण गोसावी (वय ५२, रा. निसर्ग कॉलनी), रतिलाल उर्फ मुन्ना पहेलवान संतोष सोनवणे (वय ३२, रा. हरिओम नगर), राजू सोनवणे (वय २५, रा. वाल्मिक नगर), निशांत चौधरी (वय २०, रा. शंकरराव नगर), गौरव अवटाळे (वय १९, रा. शंकरराव नगर), प्रताप पाटील (वय १९, रा. आहुजा नगर) या संशयित आरोपींना ताब्यात घेतले.




















