जळगाव मिरर | १३ जुलै २०२४
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या भुसावळ आगाराअंतर्गत बोदवड तालुक्यातील विविध गावांसाठी सोडण्यात येणाऱ्या कोरोना लॉकडाऊन कालावधीपासून बंद असलेल्या बसफेऱ्या पूर्ववत नियमित सुरू कराव्यात तसेच मुक्ताईनगर आगारा अंतर्गत मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील ग्रामीण भागातील बंद असलेल्या बसफेऱ्या नियमित सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी राज्य परिवहन महामंडळाचे जळगाव विभागिय नियंत्रक भगवान जगनोर यांची दि.२७ जुन रोजी भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे केली होती. त्यांच्या या मागणीला यश आले असुन या बसफेऱ्या पुर्ववत नियमित सुरू झाल्या आहेत त्यामुळे नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि भुसावळ आगारातून कोरोना लॉकडाऊन लागण्यापूर्वी भुसावळ ते बोदवड ,भुसावळ ते लोणवाडी , सोयखेडा , वाकी, सुरवाडा , विचवा अशा बसफेऱ्या नियमित सोडण्यात येत होत्या. त्यामुळे बोदवड तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बोदवड, वरणगाव, भुसावळ जाण्यासाठी तसेच नागरिकांना बोदवड, भुसावळ, वरणगाव येथे बाजारहाट, दवाखाना व इतर कामांसाठी ये-जा करणे सोयीचे होत होते. परंतु कोरोना लॉकडाऊन कालावधीपासून या बसफेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या तसेच मुक्ताईनगर आगारअंतर्गत मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांसाठी बसफेऱ्यांचे नियोजन केले जाते परंतु उन्हाळ्यात लग्नसोहळे आणि इतर प्रासंगिक करारासाठी बसची मागणी जास्त असल्याने आणि शाळा महाविद्यालयांना सुट्या असल्याने ग्रामीण भागातील बहुतांशी बसफेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या.
बसफेऱ्या बंद असल्याने विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय होत होती प्रसंगी जादा प्रवास भाडे खर्च करून खासगी प्रवासी वाहनाने विद्यार्थी व नागरिकांना प्रवास करावा लागत होता हि बाब लक्षात घेऊन रोहिणी खडसे यांनी दि २७ जुन रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांची भेट घेऊन त्यांना बंद असलेल्या बसफेऱ्या नियमित सुरू कराव्यात, त्यासाठी संबंधित भुसावळ व मुक्ताईनगर आगार प्रमुखांना आपल्या स्तरावरून सूचना द्याव्यात व बंद असलेल्या बसफेऱ्या पूर्ववत नियमित सुरू करून विद्यार्थ्यांच्या व नागरिकांच्या वेळ आणि पैशांचा अपव्यय टाळून दिलासा द्यावा अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केली होती याला अनुसरून विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांनी भुसावळ व मुक्ताईनगर आगार प्रमुखांना सदर बसफेऱ्या पुर्ववत नियमित सुरू करण्या बाबत लेखी सुचना केल्या आहेत.
त्या अनुषंगाने भुसावळ आगरातून भुसावळ ते बोदवड सुरवाडा मार्गे (सकाळी ११:३० ,दुपारी १.४० वा.), भुसावळ ते लोणवाडी (संध्याकाळी ७ वा), सोयखेडा (सकाळी ७.३० वा), वाकी (सकाळी ८ वा, दुपारी ४.१० वा), सुरवाडा (सकाळी ५:३० वा दुपारी २.१० वा), विचवा (दुपारी ३.४० वा) अशा बसफेऱ्या पुर्वी प्रमाणे नियमित सुरू झाल्या आहेत रोहिणी खडसे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असुन सदर बसफेऱ्या पुर्ववत नियमित सुरू झाल्याने विद्यार्थी व नागरिकांची होणारी गैरसोय टळून वेळेची आणि पैशांची बचत होणार असल्याने विद्यार्थी व नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यामुळे विद्यार्थी नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.