
जळगाव मिरर | ७ डिसेंबर २०२४
तीन लाखांची लाच घेतांना पकडण्यात आलेल्या खासगी पंटरला न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यास अटक करण्यात येत असतांना त्यास हृदयविकाराचा त्रास होत असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरटीओ दीपक पाटील यांनी पंटर भिकन भावेच्या माध्यमातून तक्रारदारास नवापूर सीमा तपासणी नाक्यावर नियुक्तीसाठी तीन लाखांच्या लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडे तक्रार केली होती. त्यानुसार दि. ५ डिसेंबर रोजी सापळा रचून खासगी पंटर भिकन भावे याला तीन लाख रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले होते. भिकन भावेच्या माहितीरून दीपक पाटील यांनाही ताब्यात घेण्यात आले होते. दोघांच्याविरुद्ध रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. त्या ठिकाणी दीपक पाटील यांनी प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना तेथेच उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या असून त्याचे अहवाल येणे बाकी आहे. तसेच त्यांची वेळोवेळी ईसीजी केले जात आहे, अशी माहिती डॉ. अमित भंगाळे यांनी दिली.
दुसरा संशयित भिकन भावे याची वैद्यकीय तपासणी करून त्याला अटक करण्यात आले. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. सुरेंद्र काबरा यांनी काम पाहिले. सदर प्रकरणाचा तपास संभाजीनगर एसीबीकडून जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, नातेवाईकाच्या नावे अपसंपदा आहे का, मालमत्ता, बँक खाते व इतर गुंतवणुकीची चौकशी होणार आहे