
जळगाव मिरर / ५ डिसेंबर २०२४
जिल्ह्यात नेहमीच आरटीओ कार्यालय कुठल्याना कुठल्या कारणाने चर्चेत येत असते, गेल्या काही महिन्यापासून जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण वाढत असून आज जळगाव शहरातील आरटीओ कार्यालयतील मोठ्या अधिकाऱ्याने लाच घेतल्याची घटना दुपारी घडल्यानंतर मोठी खळबळ उडाली. हि कारवाई छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा लावत केली आहे. परिवहन विभागातील अधिकारी दीपक पाटील याला तब्बल तीन लाख रुपयांची लाच घेतांना पंटरसह ताब्यात घेण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, आज गुरुवार दि.5 डिसेंबर रोजी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तक्रारदार यांची सीमा तपासणी नाका नवापूर येथे नोव्हेंबर 2024 या महिन्यात नियुक्ती दिल्याचा मोबदला म्हणून तीन लाख रुपये लाचेची मागणी करून, प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक अण्णा पाटील याने लाच देण्यास प्रोत्साहन देऊन खाजगी पंटर भिकन मुकुंद भावे याच्या मार्फत पंच साक्षीदारा समक्ष लाच स्वीकारली असता खाजगी इसम व आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
ही कारवार्इ सापळा सहाय्यक अधिकारी सुरेश नाईकनवरे, अशोक नागरगोजे, युवराज हिवाळे, विलास चव्हाण, सचिन बारसे, सी.एन. बागुल यांच्या पथकाने केली.