
जळगाव मिरर | २ जून २०२५
जामनेर तालुक्यातील गारखेडा रोडवरील हॉटेल साई ढाब्याजवळ संगीतम ट्रॅव्हल्स ही खाजगी बस रस्त्याच्या खाली पलटी झाल्याची घटना दि. १ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात बसमधील ७ ते ८ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी भ्रमणध्वनीवरून घटनेची माहिती जाणून घेतली असून, जखमींना धीर दिला आहे. संगितम ट्रॅव्हल्सची बस (एमएच १९ सीवाय २२२४) भुसावळ येथून २६ प्रवासी घेऊन जामनेरमार्गे पुणे येथे जाण्यासाठी दि. १ रोजी रात्री निघाली होती. ही बस गारखेडा गावाजवळील हॉटेल साई ढाव्याजवळ आल्यावर चालकाचा बस वरील ताबा सुटल्याने ती रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली. त्यात महिला, पुरुष व लहान बालकांसह सुमारे ७ ते ८ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
सविस्तर वृत्त असे कि, जखमींना उपचारासाठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. या जखमी प्रवाशांची राहण्याची सुविधा मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयात करण्यात आलेली आहे. अपघात झालेल्या बसच्या चालकाने मद्यपान केले होते. चालक व वाहक यांच्यात शाब्दिक चकमक सुरू होती. त्यातूनच हा अपघात घडला असल्याची माहिती जखमी प्रवाशांनी यावेळी दिली. या घटनेमुळे पुन्हा एकदा खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर भुसावळ ते जामनेर या रस्त्याचे काम संथगतीने सुरू असून, ते त्वरीत पुर्ण करावे, अशी मागणी केली जात आहे.




















