जळगाव मिरर | १ जानेवारी २०२४
गेल्या काही महिन्यापासून पुणे शहरातील विविध परिसर अपघाताच्या माध्यमातून मोठ्या चर्चेत आला आहे. नुकतेच लोहगाव येथील डी. वाय. पाटील कॉलेज रस्त्यावर सध्या ड्रेनेज पाइपलाइन टाकायचे काम सुरू आहे. या रस्त्यावरून दररोज हजारो वाहने ये-जा करत असतात. काम चालू असताना काही दुर्घटना होऊ नये म्हणून लोहगाव येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी वारंवार सूचना करत उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मात्र, पुणे महापालिकेने त्याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याने ड्रेनेज लाइनच्या खड्ड्यात रविवारी (दि. ३१) सकाळी स्कूल व्हॅन पलटी झाली आहे. या अपघातात स्कूल व्हॅनचालक जखमी झाला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी काम करत असताना वारंवार उपाययोजना करण्याची मागणी केली होती. सूचना फलक किंवा बरिकेट्स लावा, अशी विनंती देखील केली होती. ठाकरे गटाचे प्रभाग प्रमुख संजय मोझे आणि शाखा प्रमुख निखिल खांदवे आणि युवासेना उपविभाग अधिकारी श्रीकांत खांदवे यांनी याप्रकरणी कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
डी. वाय. पाटील कॉलेज रस्त्यावर ड्रेनेज पाइपलाइन टाकण्यासाठी ७ ते ८ फूट खोदण्याचे काम सुरू आहे. मात्र, याठिकाणी कोणत्याही उपाययोजना अथवा खड्ड्याच्या बाजूने कोणत्याही प्रकारचे बरिकेट्स लावलेले नाही. तसेच वाहनचालकांसाठी कोणत्याही प्रकारचे सूचना फलक या ठिकाणी प्रशासनाकडून किंवा ठेकेदाराकडून लावण्यात आलेले नाही. त्यामुळे रविवारी सकाळी स्कूल व्हॅनचा अपघात झाला आहे. त्यात गाडीचा चालक जखमी झाला आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी उपविभाग अधिकारी श्रीकांत खांदवे यांनी केली आहे.