
जळगाव मिरर | ८ मे २०२५
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच आता नागपूर येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून तरुणाने प्रेयसीची डोक्याच्या मागील बाजूस रॉड मारून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी नागपूर शहरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हेमलता वैद्य असे ३० वर्षीय मृत प्रेयसीचे नाव आहे. ती पतीच्या मृत्यूनंतर नागपुरात मुलीसह राहत होती. तिचे अक्षय दाते या तरुणासोबत तीन वर्षापासून प्रेम होते. दोघेही वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील आहेत. हेमलताच्या चारित्र्यावर अक्षय नेहमी संशय घेत होता. त्यावरून दोघांचे भांडण होते असे. अक्षयने हेमलताशी वाद घालत डोक्याच्या मागील बाजूस धारदार शस्त्राने वार करत जखमी केले. सोसायटीतील लोकांनी हेमलताला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी अक्षयला तत्काळ अटक करत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गिट्टीखदान पोलीस करीत आहे.