
जळगाव मिरर | २४ एप्रिल २०२५
भाजपचे माजी खासदार आणि टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना ‘आयएसआयएस काश्मीर’ (ISIS Kashmir) कडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या प्रकरणी गंभीर यांनी बुधवारी दिल्ली पोलिसांशी संपर्क साधून तातडीने दखल घेण्याची मागणी केली. त्यांनी औपचारिकपणे राजिंदर नगर पोलिस स्थानकाचे एसएचओ आणि दिल्ली सेंट्रलचे डीसीपी यांच्याकडे एफआयआर नोंदवण्यासाठी तक्रार दाखल केली आहे.
त्यांनी त्यांच्या कुटुंबाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची विनंती सुरक्षा यंत्रणांकडे केली आहे. या धमकीचे गांभीर्य लक्षात घेता, दिल्ली पोलिस या प्रकरणी सखोल चौकशी करतील. तसेच गंभीर आणि त्याच्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलतील, अशी अपेक्षा आहे. २२ एप्रिल रोजी गंभीर यांना धमकीचे दोन ईमेल मिळाले. एक दुपारी आणि दुसरा संध्याकाळी ईमेल आला. दोन्हीमध्ये ‘IKillU’ असा धमकीचा मेसेज होता. गंभीर यांना अशा धमक्या मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. नोव्हेंबर २०२१ मध्ये, गंभीर खासदार असताना त्यांना असाच एक ईमेल आला होता.
दरम्यान, पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या घटनेबद्दल गंभीर यांनी निषेध व्यक्त केला होता. या हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला. ”मृतांच्या कुटुंबियांप्रति माझ्या संवेदना. यासाठी जबाबदार असलेल्यांना किमत मोजावी लागेल. भारत स्ट्राइक करेल.” असे २२ एप्रिल रोजीच्या X वरील पोस्टमध्ये गंभीर यांनी म्हटले होते. गंभीर व्यतिरिक्त सचिन तेंडुलकर, विराट कोहली, सूर्यकुमार यादव यासह अनेक क्रिकेटपटूंनीही पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. भारताचे माजी क्रिकेटपटू श्रीवत्स गोस्वामी यांनी पाकिस्तानसोबतचे क्रीडा संबंध पूर्णपणे तोडण्याची मागणी केली आहे.