जळगाव मिरर | २९ ऑक्टोबर २०२५
राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार जनशक्तीचे पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, सरकारविरोधात महाएल्गार पुकारला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरात भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेतकरी पक्षाचे नेते रविकांत तुपकर हे देखील सहभागी झाले होते. त्यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना आपल्या भाषणातून खळबळ उडवून देणारे विधान केले आहे.
जसं बच्चूभाऊंनी सांगितलं की, दोन-चार आमदारांना कापा. तसं मी सांगतो की, दोन-चार मंत्र्यांना कापा, असे खळबळ उडवून देणारे विधान रविकांत तुपकर यांनी केले आहे. त्यांच्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांनी देखील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून आक्रमक पवित्रा घेत हे धक्कादायक विधान केले आहे.
रविकांत तुपकर यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, शासनाने शेतकऱ्यांना लुटले म्हणून शेतकरी कर्जबाजारी झाले, सरकारने आता शेतकऱ्यांजवळ येऊन शेतकऱ्यांची मागणी मान्य करावी. आम्ही भीक नव्हे तर आमचा हक्क मागायला आलो आहे. आम्ही आत्महत्या करून मरणार नाही, तर हक्क घेऊन मरणार आहोत, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. जातीचा मोर्चा निघाला की सरकार आंदोलनस्थळी चर्चेसाठी येते. मग आज आमच्या मातीचा मोर्चा निघाला तर तुम्ही इथे का येऊ शकत नाहीत? असा सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे.
पुढे तुपकर म्हणाले, महाराष्ट्रातील आम्ही सर्व शेतकरी नेते एकत्र आहोत. ही अभूतपुर्व गोष्ट या ठिकाणी घडताना दिसत आहे. आम्ही वेगवेगळ्या भागात लढतो. पण शेतकऱ्यांची वज्रमुठ एका ठिकाणी आणण्याचे काम बच्चू कडू यांनी केले आहे. हा मोर्चा अशा ठिकाणी आणला आहे की समृद्धी महामार्ग बंद, हैदराबाद जबलपूर मार्ग बंद केले आहेत. त्यामुळे सरकारचे नाक दाबल्याशिवाय सरकारचे तोंड उघडत नाही, असे विधान करत दोन्ही शेतकरी नेत्यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
या आंदोलनाला राजू शेट्टी, महादेव जानकर, अॅड माजी आमदार वामन चटप, विजय जावंधिया यांची आंदोलनस्थळी उपस्थिती होती. शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा आमदाराला कापून टाकावे, असे वक्तव्य माजी मंत्री बच्चू कडू यांनी संग्रामपूर येथे सभेत केले होते. त्यानंतर आता त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकत रविकांत तुपकर यांनी त्याच पद्धतीचे विधान केले आहे. यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पण ज्यावेळी बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवर वरील विधान केले होते. त्यामुळे अनेक प्रतिक्रिया समोर आल्या होत्या.
त्यानंतर बच्चू कडू यांनी आम्ही आमदार कापा म्हटलं तर तुम्ही एवढे बोंबलता, रोज एवढे शेतकरी आत्महत्या करतात त्याचा तुम्हाला काही वाईट वाटत नाही, असे म्हणत त्यांनी केलेल्या वक्तव्यावर ठाम असल्याची प्रतक्रिया दिली होती. शेतकरी कर्जमाफी झाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा निर्धार बच्चू कडू यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूरात भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या प्रमाणावर शेतकरी सहभागी झाले होते.

 
			

















