जळगाव मिरर | ९ ऑक्टोबर २०२३
राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडविणारी बातमी समोर आली आहे. झेडपी शाळेच्या शिक्षकाला अज्ञात व्यक्तींनी पेट्रोल ओतून पेटवल्याची धक्कादायक घटना वाशिमच्या मालेगावातून घडली आहे. या हल्ल्यानंतर शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील मालेगाव-बोरगाव रस्त्यावर कोल्ही शिवारात हा प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाशिमच्या मालेगाव-बोरगाव रस्त्यावर कोल्ही शिवारात शिक्षकाला अज्ञात व्यक्तींनी रॉडने डोक्यावर मारहाण करून पेट्रोल ओतून पेटवले. या हल्ल्यात शिक्षक दिलीप धोंडोजी सोनवणे हे गंभीर जखमी झाले. या हल्ल्यानंतर रुग्णालयात दाखल केलेल्या शिक्षक दिलीप यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शिक्षकाच्या मृत्यूनंतर झेडपी शाळेच्या शिक्षकांच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
मालेगाव तालुक्यातील बोरगाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले दिलीप धोंडोजी सोनवणे हे आज सोमवारी बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत जात असताना शिक्षक दिलीप सोनवणे यांचा अज्ञात व्यक्तींनी रस्ता अडवला. मालेगाव-बोरगाव रोडवर कोल्ही शिवारात अज्ञात व्यक्तींनी दिलीप सोनवणे यांचा रस्ता अडवून त्यांच्या डोक्यावर रॉडने मारहाण केली.
त्यानंतर अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतलं आणि पेटवून दिलं. या घटनेत शिक्षक दिलीप सोनवणे गंभीररित्या जखमी झाले. त्यानंतर स्थानिकांनी त्यांना वाशिम येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी शिक्षक दिलीप सोनवणे यांना मृत घोषित केले.