जळगाव मिरर | ३० जुलै २०२४
तापी पाटबंधारे विकास महामंडळ,जळगाव मध्ये शेततळे व इतर कामांत कोट्यवधी रुपयांचा गैरप्रकार करणाऱ्या कार्यकारी अभियंता श्री.गोकुळ श्रावण महाजन व त्यांच्या सहकाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून “भ्रष्टाचांऱ्याचा सन्मान..हाच अधिकांऱ्याचा मान” हे अभिनव आंदोलन करण्यात आले.
अधिक्षक अभियंता,जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ यांच्या कार्यालयाबाहेर दुपारी ४ वाजता ” होऊद्या दाखल गुन्हा.. आम्ही भ्रष्टाचार करू पुन्हा” असे घोषवाक्य लिहलेल्या अभियंत्यांच्या प्रतीकात्मक खुर्चीला पुष्पहार अर्पण उदबत्ती लावण्यात येवून शेततळे कामात गैरप्रकार करणाऱ्या अभियंत्याला निलंबित करा, न्याय द्या न्याय *द्या खुर्चीला न्याय द्या होउद्या दाखल गुन्हा भ्रष्टाचार करू पुन्हा* अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. अचानक झालेल्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले गेले. शेततळे कामामध्ये गैरप्रकार करणारे कार्यकारी अभियंता श्री. गोकुळ महाजन यांच्यावर एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाने आदेश देवूनही त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याने आंदोलनकर्त्यांनी येत्या सात दिवसात कारवाई न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
यावेळी जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ येथील अधिक्षक अभियंता श्री. भदाणे यांच्या वतीने कार्यालय अधिक्षक यांना भ्रष्ट अधिकाऱ्यांना असेच पाठबळ देत रहा असे सांगून पुष्पगुच्छ देऊन निवेदन देण्यात आले. आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष रिकू उमाकांत चौधरी,सुनील माळी,डॉ.संग्राम सुर्यवंशी,किरण राजपूत,चेतन पवार,आकाश हिवाळे,हितेश जावळे,योगेश साळी,सचिन साळुंखे,विनोद ढमाले, भल्ला तडवी,शैलेश अभंगे, खलील शेख, मतीन सैय्यद,ललित चौधरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते