
जळगाव मिरर | १० जून २०२५
गेल्या काही दिवसापासून शरद पवार व अजित पवार एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु असतांना आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा २६ वा वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पक्षातील ज्येष्ठ नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच महिलांबाबत मोठी घोषणा केली.
पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांमध्ये आपण महिलांना 50 टक्के संधी देणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये महिलांना पक्षाकडून मोठी संधी मिळणार असून त्यांना प्रवाहात आणले जाणार असल्याचे सप्ष्ट झाले आहे.
हा पक्ष सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला संधी देतो. महाराष्ट्राचा चेहरा बदलणाऱ्यांना कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे. तुम्हा सगळ्यांच्या बांधिलकीवर आणि कष्टावर हा पक्ष उभा असल्याचे देखील शरद पवार यावेळी बोलताना नमूद केले. जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका निवडणुका 2 ते 3 महिन्यावर आल्या आहेत. तिथं 50 टक्के भगिनींना निवडून द्यायचं आहे. त्यांना संधी दिली तर त्याही कर्तृत्व दाखवू शकतात, असा विचार त्यांना मांडला.
या कार्यक्रमात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदापासून मुक्त करण्याची इच्छा बोलून दाखवली. जयंत पाटील यांच्यानंतर व्यासपीठावर शरद पवार यांनी पक्षातील सर्वांना संबोधित केले. जयंतरावांनी संघटना मजबूत करण्याचे काम केले आहे. हाडांच्या कार्यकर्त्यांना संधी देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे आगामी काळात पक्षात मोठे संघटनात्मक बदल करण्याचे संकेत शरद पवारांनी यावेळी दिले आहेत.





















