
जळगाव मिरर । ३० ऑक्टोबर २०२२
जीवन क्षणभंगुर असल्याने त्याचा भरवसा धरता येत नाही. म्हणून सावध होऊन सद्सद्विचार केला पाहिजे व संतांनी दाखवलेल्या मार्गाने गेले पाहिजे. संतसंगतीरूपी नौकेतून भवसागर सहज पार जाता येईल. मनुष्यदेहाच्या बाजारात आलेल्या मनुष्याने भगवान शारंगधर यांच्या भक्तिकडे वळावे. असे न करता केवळ संसाराच्या नादी लागला तर मनुष्य देह फुकट जाईल, असे प्रतिपादन हभप रामेश्वर महाराज निमखेडीकर यांनी केले.
भुसावळ येथील दूर्गा कॉलनीत स्व.सौ. निशा पाटील यांच्या प्रथम स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित कीर्तनात ते बोलत होते. प्रारंभी भक्ती पाटील व श्रद्धा पाटील यांच्या हस्ते स्व. निशा पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कीर्तनात हभप चंद्रकांत महाराज, हभप लक्ष्मण महाराज, वसंत बऱ्हाटे, रामसिंग पाटील, भूपेश बडगुजर यांनी साथसंगत केली. ‘ये साते आलिया ओळगा शारंगधरू’ या ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभंगांचे चिंतन करताना रामेश्वर महाराज म्हणाले की, संसार म्हणजे जन्म आणि मृत्यू आणि या दोन्हींमध्ये असतो तो म्हणजे प्रपंच. तो जसा गृहस्थाचा असतो तसा तो संन्याशाचा सुद्धा असतो. गृहस्थ म्हटले की त्याला पत्नी, मुले-बाळे, आई वडील सर्व नाते-गोते येतातच. या सर्वांचा सहवास फार सुखाचा असतो असे नाही. पण यातच जीवाला सुख वाटत असते. संसारामध्ये आईबाप, पत्नी, मुलगा वगैरे गणगोत माझे आहे असे वाटते. परंतु यामध्ये कोणाचा कोणाशी संबंध नसतो. ही सर्व आपल्या डोळ्यादेखत पाहाता पाहाता मृगजळाप्रमाणे नाहीशी होतील. तसेच विषयाचे सुख नेहमी वाटते, पण बेगडाच्या बाहुलीचा रंग जसा लवकर नाहीसा होतो किंवा आभाळ आल्यामुळे आलेली सावली जसी क्षणमात्रच असते, त्याप्रमाणे हे विषयसौख्य पाहाता पाहाता नष्ट होईल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, विचार करुन पाहिले असता स्वप्नातून जागे झालेल्या मनुष्याचे स्वपात पाहिलेले ऐश्वर्य जसे एका क्षणात नष्ट होऊन जाते, त्याप्रमाणे हे आप्तेष्ट किंवा त्यापासून वाटणारे सुख क्षणमात्रातच नष्ट होईल. म्हणून चैतन्य स्वरूप परमात्मा विठ्ठलाचे मनोभावे भजन कीर्तन भक्ती करून आपला संसार सुखाचा करून घ्यावा म्हणून माऊलींनी सांगितले असल्याचेही हभप रामेश्वर महाराज यांनी सांगितले. यशस्वीतेसाठी सौ. विमलबाई पाटील, मनोज पाटील, संजीव पाटील, डी.के. पाटील, डॉ. जगदीश पाटील यांनी परिश्रम घेतले. परिसरातील भाविकांनी कीर्तनाचा लाभ घेतला.




















